कृषी विभागाच्या कारवाईची कृषी केंद्र चालकात धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 10:09 PM2020-06-30T22:09:52+5:302020-06-30T22:12:04+5:30
कृषी विभागाच्या कारवाईने कृषी केंद्र चालक खडबडून जागे झाले आहेत. जिल्हात शुक्रवारी नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, गुण नियंत्रण अधिकारी प्रदीप म्हसकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा व तालुका भरारी पथकाने एकत्रित कारवाई केली
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ऐन खरीप हंगामात जादा दराने खतांची विक्री करून शेतकऱ्यांना लुटण्याऱ्या कृषी केंद्र चालकांना निलंबित केल्याने जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांत धास्ती पसरली आहे. जादा दराने खत बियाण्यांच्या विक्रीसह पॉस मशीन व खतसाठा रजिस्टरवरील हिशोब जुळत नसल्याने कृषी विभागाकडून गत महिभरात अनेक कृषी केंद्रांवर करकारवाई करुन अनेक दुकानांचा विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
कृषी केंद्र चालकांविरुद्ध कारवाईची जिल्हा कृषी विभागाने धडक मोहीम उघडली आहे. यासाठी जिल्ह्यात आठ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. स्वत: जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी मिलींद लाड या पथकांवर लक्ष ठेवून दररोज दैनंदिन आढावा घेत आहेत.
गत आठवड्यात जिल्ह्यात १२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने एकाच वेळी रद्द करण्यात आले आहेत. पॉस मशीन व खत साठ्यात तफावत आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.
कृषी विभागाच्या कारवाईने कृषी केंद्र चालक खडबडून जागे झाले आहेत. जिल्हात शुक्रवारी नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, गुण नियंत्रण अधिकारी प्रदीप म्हसकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा व तालुका भरारी पथकाने एकत्रित कारवाई केली.
यामध्ये मोहाडी तालुक्यातील दहा कृषी केंद्रांवर तर तुमसर तालुक्यातील दोन कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईत करडी परिसरातील सर्वाधिक कृषी केंद्रांचा समावेश आहे.
कृषी विभागाने अचानक धाड मारली असता या कृषी केंद्रांत शासनाच्या निर्देशांचे पालन करत नसल्याचे दिसून आले. काही ठिकाणी दुकानदार बिलावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या न घेता त्यांना तसेच बिल दिल्याचेही दिसून आले. या सर्व कृषी केंद्र चालकांवर रासायनिक खते नियंत्रण आदेशांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी विश्वजीत पाडवी, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, मोहीम अधिकारी विकास चौधरी, मोहाडी तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, तुमसर तालुका कृषी अधिकारी विलास काळे, मोहाडी पंचायत समिती कृषी अधिकारी रवींद्र वंजारी, तुमसरचे संजय न्यायमूर्ती हे सहभागी झाले होते. खरीप हंगामाच्या तोंडावर अनेक कृषी केंद्र चालकांकडून शेतकºयांची लूट केली जात आहे. याबाबत तक्रारी वाढताच कृषी विभागाने जिल्ह्यात धडक मोहीम हाती घेतली आहे. ही कारवाई सुरु राहिल्यास शेतकºयांना लुबाडण्याची दुकानदारांची हिंमत होणार नाही.