महालगाव नहराचा 'आऊटलेट' कोसळण्याची भीती
By admin | Published: September 17, 2015 12:38 AM2015-09-17T00:38:05+5:302015-09-17T00:38:05+5:30
मध्यम प्रकल्प चांदपुर जलाशयाच्या डाव्या कालव्याला महालगाव शिवारातील शेतकऱ्यांना पाणी वाटप करण्यासाठी नहर जोडण्यात आलेला आहे.
अद्याप दुरुस्ती नाही : पाणी वाटप प्रभावित होणार
चुल्हाड (सिहोरा) : मध्यम प्रकल्प चांदपुर जलाशयाच्या डाव्या कालव्याला महालगाव शिवारातील शेतकऱ्यांना पाणी वाटप करण्यासाठी नहर जोडण्यात आलेला आहे. या नहरांचा मुख्य आऊटलेट कोसळण्याची भीती निर्माण झाली असून पाच गावात पाणी वाटप प्रभावित होणार आहे.
मध्यम प्रकल्प चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्यासाठी सिहोरा परिसरात डावा आणि उजवा कालव्याची निर्मिती करण्यात आली आहे. या मुख्य कालव्यांना मोठे नहर तथा पादचाऱ्या जोडण्यात आले आहेत. डावा कालवाअंतर्गत वारपिंडकेपार, महालगाव, ब्राह्मणटोला, देवसर्रा, बपेरा, सुकडी (नकुल) गोंडीटोला गाव शिवारातील शेतीला पाणी वाटप करण्यासाठी महालगाव मायनर या नावाने नहरांची निर्मिती करण्यात आली आहे. डावा कालवा या मुख्य कालव्यावर महालगाव मायनरचे आऊटलेट तथा दरवाजा बांधकाम करण्यात आले आहे.
या आऊटलेटचे बांधकाम दगडाचे असून लोखंडी दरवाजा तुटला आहे. दरम्यान, प्रथम टप्प्यातील पाणी वाटपात या आऊटलेट दगड कोसळली आहेत.
या शिवाय लोखंडी दरवाजा तुटल्याने लाकडी ओडण्यांचा आधार देण्यात आलेला आहे. याच आऊटलेट वरुन वाहतुक सुरु राहत असल्याने कोणत्याही क्षणी आऊटलेट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. दुसऱ्या टप्प्यात धान पिकाला पाणी वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शेतकरी पाणी सोडण्याची ओरड करीत आहेत. यामुळे या पाण्याच्या प्रवाह आणि वेगात आऊटलेट भुईसपाट होण्याचा अंदाज कार्यरत कर्मचारी व्यक्त करीत आहेत.
या संदर्भात कार्यरत अमिन यांनी वरिष्ठांना या आऊटेटची माहिती दिली आहे. परंतु कुणी ऐकायला तयार नाहीत. सध्या पाणी वाटप बंद असताना यंत्रणेमार्फत या आऊटलेट व लोखंडी दरवाजाचे दुरुस्ती करण्याचे सौजन्य दाखविण्यात आले नाही. या आऊटलेटचे क्रांकीट करण्याचे वरिष्ठांनी निर्देश दिले असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु शाखा अभियंते प्रभारी असल्याने स्थिती जैसे थे आहे. सध्या स्थित मध्यम प्रकल्प चांदपूर जलाशयाचा प्रशासकीय कारभार सैरवैर आहे. डावा व उजवा कालवा अंतर्गत शाखा अभियंताचे पदे रिक्त आहेत. शाखा कारकुन, लिपीक आणि अमिन यांची पदे रिक्त असुन चतुर्थ क्षेणीतील तीन कर्मचारी १४ हजार हेक्टर आर शेतीला पाणी वाटपाचे नियोजन करीत आहेत. (वार्ताहर)