कोरोनाच्या धास्तीने बारव्हा परिसरात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:32 AM2021-04-26T04:32:22+5:302021-04-26T04:32:22+5:30
बारव्हा : कोरोना धास्तीने एकमेकांच्या घरी जाणे, तसेच सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करणे हे सर्व टाळले जात असून एकमेकांकडे जाणाऱ्याची ...
बारव्हा : कोरोना धास्तीने एकमेकांच्या घरी जाणे, तसेच सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करणे हे सर्व टाळले जात असून एकमेकांकडे जाणाऱ्याची संख्याही कमी झाली आहे. कोरोनापासून ग्रामीण भागामध्ये विशेष काळजी घेतली जात असल्याचे गावातील शुकशुकाटामुळे दिसून येत आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाची भीती जास्त असली, तरी सर्दी, ताप, अंगदुखी अशी लक्षणे दिसली, तरी अनेकजण कोरोनाची तपासणी करून घेण्यास घाबरत आहेत. लाखांदूर तालुक्यातील बारव्हा परिसरातील सर्वच व्यवसायांवर कोरोनाचा परिणाम झाला आहे. नागरिक फक्त महत्त्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडताना दिसत आहेत. कोरोनापूर्वी बारव्हा गावातील शाळा, महाविद्यालय, बाजारपेठेतील छोटछोटे पानटपरी, चहाचे स्टॉल, सलून, कापड दुकाने, शासकीय कार्यालये गर्दीने गजबजलेले राहत होते.
मात्र, कोरोनाच्या भीतीने सर्वत्र आता शुकशुकाट आहे. शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. परिसरातील विवाह, तसेच इतर शुभकार्य पुढे ढकलले आहेत. तर काही नागरिक विवाह सोहळे थोडक्यात उरकून घेत आहेत. बारव्हा परिसरातील आसपासच्या गावांची अर्थव्यवस्था बारव्हा येथील सोमवारच्या आठवडी बाजारावर अवलंबून आहे. छोटे व्यावसायिक, भाजीपाला, धान्ये-कडधान्य तथा जीवनावश्यक वस्तू, संसारोपयोगी साहित्य या आठवडी बाजारातूनच खरेदी, विक्री केली जाते. आठवडी बाजार बंद झाल्याने आता व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात बदल झाला. कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात सर्दी, खोकला, तापीने नागरिक ग्रासलेले आहेत. खासगी दवाखान्यात रुग्णाची संख्या सर्वाधिक दिसून येत आहे. कोरोना चाचणी केली, तर पॉझिटिव्ह आल्यास कोविड सेंटर जावे लागेल, म्हणून बरेच लोक घरात गोळ्या औषधी घेऊन उपचार करून घेत आहेत. कोरोना चाचणी असो किवा लसीकरण यासाठी ग्रामीण भागातून पाहिजे त्या प्रमाणवर नागरिक पुढे येताना दिसत नाहीत. बारव्हा परिसरातील गावकरी काळजी घेत असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.