भंडारा रुग्णालयाच्या प्रसूतीपश्चात वॉर्डात पसरलीय भयाण शांतता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 02:08 AM2021-01-15T02:08:01+5:302021-01-15T02:08:51+5:30
विशेष नवजात अतिदक्षता कक्षालगतच हे दोन प्रसूतीपश्चात वॉर्ड आहेत. या वॉर्डात त्या रात्री ३४ प्रसूती झालेल्या महिला आपल्या चिमुकल्यांसह झोपल्या होत्या
ज्ञानेश्वर मुंदे
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडाला पाच दिवस उलटले तरी प्रसूतीपश्चात वॉर्डात अद्यापही भयाण शांतता आहे. एक वॉर्ड रिकामा करून लगतच्या वॉर्डात सर्व मातांना ठेवण्यात आले असून, त्यांच्या डोळ्यात बाळाच्या सुरक्षेची भीती स्पष्टपणे दिसून येते. मोजकेच अधिकारी आणि परिचारिका येथे कर्तव्य बजावताना दिसतात.
विशेष नवजात अतिदक्षता कक्षालगतच हे दोन प्रसूतीपश्चात वॉर्ड आहेत. या वॉर्डात त्या रात्री ३४ प्रसूती झालेल्या महिला आपल्या चिमुकल्यांसह झोपल्या होत्या. घटनेनंतर वॉर्ड क्रमांक ६ रिकामा करण्यात आला असून, ३४ नवजात बालके आणि मातांना ताबडतोब सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. आता या मातांची व चिमुकल्यांची व्यवस्था वॉर्ड क्रमांक ७ मध्ये करण्यात आली आहे. पाच दिवस लोटूनही या दोनही वॉर्डांत भयाण शांतता दिसत आहे. वॉर्ड क्रमांक ६ मधील सर्व बेड ओस पडलेले आहेत.
पाच दिवसांत
६५ बाळांचा जन्म
n रुग्णालयात अग्नितांडवानंतरच्या पाच दिवसांत ६५ बाळांनी जन्म घेतला. त्यात आकस्मिक वॉर्ड, इलेक्टिव्ह विभाग - वॉर्ड क्रमांक ६ व ७ मध्ये जन्मलेल्या बाळांचा समावेश आहे.
n शनिवार, ९ जानेवारी ते १३ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत बाळांच्या जन्माची नोंद आहे. घटनेच्या दिवशी प्रसूतीसाठी आठ गर्भवतींना दाखल करण्यात आले होते.
n त्या दिवशी सहा मुली आणि दोन मुलांचा जन्म झाला. रुग्णालयाची घडी विस्कटली असल्याने योग्य उपचार होत नसल्याची खंत काही मातांनी व्यक्त केली.
बचावलेली सात बालके तात्पुरत्या कक्षात
भीषण अग्निकांडात बचावलेल्या सात नवजात बाळांसाठी कुटुंब कल्याण विभागाच्या कक्षात तात्पुरत्या तयार करण्यात आलेल्या एसएनसीयू कक्षात हलविण्यात आले आहे. तेथे या सात बालकांवर विशेष उपचार केले जात असून, सर्वांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले.