उंबरठे झिजवून पाय थकले, पण प्रशासनाला पाझर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 10:56 PM2018-12-21T22:56:09+5:302018-12-21T22:56:34+5:30
देशातील प्रत्येक नागरिकाला २०२२ पर्यंत हक्काचे घर देण्याचा शासकीय स्तरावर गाजावाजा केला जात आहे. मात्र लाखांदूर तालुक्यातील घरकुलाचे अनेक लाभार्थी प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहे. मात्र अद्यापही त्यांना हक्काचे घर मिळाले नाही. प्रशासनाचे उंबरठे झिजवून आमचे पाय थकले, पण प्रशासनाला पाझर फूटला नाही, असे उद्विग्न होवून आता लाभार्थी म्हणत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : देशातील प्रत्येक नागरिकाला २०२२ पर्यंत हक्काचे घर देण्याचा शासकीय स्तरावर गाजावाजा केला जात आहे. मात्र लाखांदूर तालुक्यातील घरकुलाचे अनेक लाभार्थी प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहे. मात्र अद्यापही त्यांना हक्काचे घर मिळाले नाही. प्रशासनाचे उंबरठे झिजवून आमचे पाय थकले, पण प्रशासनाला पाझर फूटला नाही, असे उद्विग्न होवून आता लाभार्थी म्हणत आहे.
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सर्वांना हक्काचे घर देण्याचा संकल्प केंद्र व राज्य शासनाने केला आहे. त्यासाठी मोठा गाजावाजा केला जात आहे. मात्र समाजातील गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना पाच वर्षांपासून घरकुलच मिळाले नाही. दारिद्रयरेषेखालील प्रतीक्षा यादीत नाव असलेल्यांना आधी घरकुलाचा लाभ दिला जात होता. यात अनेक लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित रहावे लागत होते. सत्तांतर झाल्यानंतर भाजपा सरकार सत्तेत आले. या सरकारने विविध योजना अंमलात आणल्या. सध्यस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना गोरगरीबांना मोठा दिलासा देणारी आहे. या योजनेंतर्गत गोरगरीबांना हक्काचे घर दिले जाते. यासाठी शासनाने प्रपत्र ब व प्रपत्र ड याद्या तयार केल्या आहेत. प्रथम प्रपत्र ब यादीतील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिल्या जात आहे. मात्र समाजघटकातील कित्येक गरजू व पात्र लाभार्थ्याची नावे प्रपत्र ड यादीत आहेत. त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यातच अनेक श्रीमंताचे नावेही या योजनेत आहे. स्वत:चे मोठे घर असतानाही अनेक जण गरीबांच्या योजनेवर डोळा ठेवत आहे.
दुसरीकडे गोरगरीब या योजनेच्या लाभासाठी संबंधित विभागात पायपीट करीत आहे. लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गरजू व पात्र लाभार्थी आहेत. परंतु त्यांचे नाव योजनेच्या प्रपत्र ड मध्ये आहे. त्यामुळे त्यांना लाभापासून वंचित रहावे लागत आहे.
घरकुलाचे काम मंदगतीने
एकीकडे शासन २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे सांगत आहे. परंतु या योजनेचे काम अतिशय मंद गतीने सुरू आहे. अनेकांचे घरकुल मंजूर झाले. परंतु रेतीअभावी काम रखडले आहे. काहींना घरकुल बांधकामाचा हप्ताही मिळाला नाही. त्यामुळे अनेकांचे हक्काच्या घरात जाण्याचे स्वप्न अर्धवट आहे.