बाबासाहेबांच्या पैलूंवर ‘लोकराज्य’मध्ये उजाळा
By admin | Published: April 14, 2017 12:36 AM2017-04-14T00:36:22+5:302017-04-14T00:36:22+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगातील मानवी हक्काचा मोठा अध्याय असून त्यांच्या जीवनातील विविध पैलूंवर....
अमित मेश्राम यांचे प्रतिपादन : माहिती जनसंपर्क कार्यालयाचा उपक्रम
भंडारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगातील मानवी हक्काचा मोठा अध्याय असून त्यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचे काम लोकराज्य विशेषांकाच्या माध्यमातून माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने करण्यात आल्याचे प्रतिपादन जिल्हा कोषागार अधिकारी अमीत मेश्राम यांनी केले.
येथील जिल्हा कोषागार कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचानालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन अमित मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा माहिती अधिाकरी रवी गीते, अप्पर कोषागार अधिकारी अर्चना कसबेकर, राजू शेंडे, राजू कणखर, सहाय्यक लेखाधिकारी अनिल बोंद्रे, कोषागार कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अमित मेश्राम म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कठोर ज्ञान साधनेमुळेच ते उन्नत झाले. त्यांचा अभ्यास सर्वव्यापी होता. खऱ्या अर्थाने ते महात्मा फुले यांच्या विचारांचे वारसदार आहेत. पत्रकारिता क्षेत्रासह दलित वंचित स्त्रियांसाठी त्यांनी मोठे काम केले. या त्यांच्या कार्याचा आढावा लोकराज्यच्या विशेषांकात घेण्यात आला आहे.
समाजाला माहित नसलेल्या बाबासाहेबांच्या अनेक पैलूंची माहिती या विशेषांकात देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सरकारच्या वतीने देश विदेशात उभारण्यात येणाऱ्या बाबासाहेबांच्या विविध स्मारकांचा आढावाही या विशेषांकात घेण्यात आला आहे. ही स्मारके पुढच्या अनेक पिढीसाठी प्रेरणा व उर्जा देणारी ठरणार आहेत.
बाबासाहेबांनी आयुष्यभर तत्त्वनिष्ठा जपली. स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी त्यांनी काम केले. त्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी अस्पृश्य महिला परिषदा भरविल्या. त्यांच्या सत्याग्रहात वंचित, दलित महिलांचा मोठा सहभाग होता. बाबासाहेबांच्या पत्रकारितेतील कार्यकाळ कमी असला तरी तो समृद्ध होता. २० व्या शतकातील पहिल्या पर्वातील ते मोठे पत्रकार होते. समाजातील दलित वंचित घटकांना न्याय देण्याचे काम त्यांच्या लेखणीने केले.
देशाच्या उभारणीत त्यांचा वाटा मोठा असल्याचे मेश्राम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)