गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू
By admin | Published: July 15, 2016 12:42 AM2016-07-15T00:42:17+5:302016-07-15T00:42:17+5:30
आमिष दाखवून एका युवतीचे शारीरिक शोषण केले. यात गर्भधारणा झाल्यावर तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आरोपी मोकाट : साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा
साकोली : आमिष दाखवून एका युवतीचे शारीरिक शोषण केले. यात गर्भधारणा झाल्यावर तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात गर्भपातादरम्यान युवतीचा मृत्यू झाला. ही घटना साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. मनिषा राजु फुंडे (१९) रा. नवेगाव धुसाळा ता. मोहाडी असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणाची साकोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून इसमावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सुत्रानुसार, राजु फुंडे (२५) रा. नवेगाव धुसाळा व मनिषा यांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातूनच मनिषा पाच महिन्यांची गर्भवती राहिली. यानंतर या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून दोघांनीही गोबरवाही येथील नागझिरा मंदीर (तुमसर तालुका) येथे ३० मे रोजी विवाह केला व विवाहानंतर दोघेही बुटीबोरी नागपूर येथे राहायला गेले. यानंतर ५ जुलै रोजी साकोली येथे बसस्थानकात असताना मनिषाला रक्तत्राव सुरू झाला. राजुने मनिषाला उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी मनिषाला भंडारा येथे पाठविले. त्याच दिवशी मनिषाचा रात्री १२ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेची नोंंद त्याच दिवशी भंडारा पोलीस ठाण्यात करण्यात आली. प्रकरणाची सुरवात साकोली येथून झाल्याने काल १३ जुलैला साकोली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. यात राजु फुंडे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा व अवैध गर्भपात केल्याप्रकरणी कलम ११५ व ११६ नुसार गुन्हा दाखल केला. मनिषाचा मृत्यु गर्भपातानेच झाला का, गर्भपात कुठे करण्यात आला, याचा तपास सुरू आहे. यातील आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. मृतक मनिषाची आई तिरण राहांगडाले रा. डोंगरी यांनी माझ्या मुलीचा गर्भपाताने मृत्यू झाल्याची तक्रार दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)