मादी बिबट नवजात पिलांकडे फिरकेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 10:31 PM2018-04-07T22:31:55+5:302018-04-07T22:31:55+5:30
ऊसाच्या शेतात लागलेल्या आगीत बचावलेल्या बिबट्याच्या दोन पिलांची आई चौथ्या दिवशीही पिलांकडे फिरकली नाही. परिणामी, ही नवजात पिले सुरक्षित असली तरी आईच्या दुधापासून मुकलेली आहे. त्यामुळे वनविभागाची चांगलीच दमछाक होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ऊसाच्या शेतात लागलेल्या आगीत बचावलेल्या बिबट्याच्या दोन पिलांची आई चौथ्या दिवशीही पिलांकडे फिरकली नाही. परिणामी, ही नवजात पिले सुरक्षित असली तरी आईच्या दुधापासून मुकलेली आहे. त्यामुळे वनविभागाची चांगलीच दमछाक होत आहे.
कोका अभयारण्यालगतच्या नवेगाव येथील ऊसाच्या शेतात एका २० ते २५ दिवसांपूर्वी एका मादी बिबटने दोन पिलांना जन्म दिला होता. याची माहिती मिळताच वनविभाग या बिबटवर आणि पिलांवर लक्ष ठेऊन होता. दरम्यान, ज्या शेतकऱ्याच्या शेतात या मादी बिबटने पिलांना जन्म दिला, त्या शेतात बुधवारला आग लागली. त्यानंतर वनअधिकारी व कर्मचाºयांनी पुढाकार घेऊन पिलांना आगीपासून वाचविले. चार दिवसांपासून ही पिले वनविभागाच्या नजरेत असून सुरक्षित आहेत.
या पिलांना जुन्नर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.देशमुख आणि नागपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अरूण खोलकुटे यांच्या मार्गदर्शनात पिलांची काळजी घेण्यात येत आहे. असे असले तरी ही मादी बिबट पिलांजवळ न आल्यामुळे वनविभागाची चिंता तासागणिक वाढत आहे.
पिले सुरक्षित पण... धोका कायमच
ऊसाच्या शेतात आढळलेली ही पिले २० ते २५ दिवसांची आहेत. या पिलांना लहान बाळांना देण्यात येणारे ‘लॅक्टोजिन इंनफंट’ हे दूध देण्यात येत असल्यामुळे ही पिले सुदृढ असली तरी हे दूध आईच्या दुधापेक्षा अधिक पोषक नाही. त्यामुळे ही मादी बिबट या पिलांपर्यंत येईपर्यत या पिलांची काळजी घेताना धोका कायम आहे. या पिलांना जंतुसंसर्ग होऊ नये, यासाठी हातात ग्लोज लावूनच पिलांना हाताळण्याच्या सूचना डॉ.देशमुख यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार या पिलांची काळजी घेण्यात येत आहे. ही मादी बिबट या पिलांना घेऊन जात नाही, तोपर्यंत वनविभागाला या पिलांची सुश्रुषा करावी लागणार आहे.
मचान उभारली
मादी बिबटने ज्याठिकाणी या पिलांना जन्म दिला होता, त्याठिकाणच्या सभोवताल सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. याशिवाय नजर ठेवण्यासाठी मचान उभारण्यात आली आहे. कोका वनविभागात येणारे वनकर्मचारी आणि वनमजुरांना दिवस व रात्र पाळीत नेमण्यात आले आहे. हे सर्व अधिकारी पाळतीवर असले तरी या विभागाचे प्रमुख अधिकाºयाने अद्याप घटनास्थळावर भेट दिली नसल्याची चर्चा आहे.