आश्चर्य.. शेळीच्या स्तनाजवळील कातडीच्या पोकळीत गर्भाची वाढ; वैद्यकीय शास्त्रातील दुर्मिळ घटना
By युवराज गोमास | Published: July 4, 2023 04:46 PM2023-07-04T16:46:22+5:302023-07-04T16:50:07+5:30
संशोधनातून तज्ज्ञांना होणार दिशादर्शन
युवराज गोमासे
भंडारा : साकोली तालुक्यातील विर्शी येथे येथील शंकर कावळे यांच्या शेळीला गर्भाशय व पोटाच्या बाहेर कासेजवळ ढिल्या चामडीच्या आतील जागेत (सबक्यूटानिअस) गर्भधारणा झाली व पूर्ण वाढ झाली. विशेष म्हणजे छातीची पोकळी, पोट व श्रोणी पोकळीच्या बाहेर शरीराच्या कोणत्याही महत्वपूर्ण अवयवांचे संपर्कात हे गर्भ नव्हते. वैदयकीय शास्त्राला नवे दिशादर्शन व धक्का देणारी ही दुर्मीळ घटना ३० जून रोजी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गुणवंत भडके यांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे उघडकीस आली.
स्त्री असो की कोणताही मादा प्राणी, नर व मादा बिजांच्या संयोगाने फलित गर्भाची वाढ गर्भाशयात होवून बाळाचा/ पिल्लांचा जन्म होतो. साधारणपणे, फलित अंडी गर्भाशयाच्या अस्तराला जुडते व गर्भ पिशवीत वाढतात. गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक तसे नैसर्गिक वातावरण गर्भाशयात असते. परंतु, लाखातून एखाद्या वेळेस एक्टोपिक गर्भधारणा संभवते. जेव्हा नर व मादा बिजाचा संयोग होवुन फलित अंडी गर्भाशयाच्या मुख्य पोकळीबाहेर प्रत्यारोपित होते आणि वाढते.
अशी गर्भधारणा बहुतेकदा फॅलोपियन ट्यूबमध्ये होते, जी ट्यूब अंडाशयातून गर्भाशयात अंडी वाहून नेते. एक्टोपिक गर्भधारणेला ट्यूबल गर्भधारणा असे म्हटले जाते. कधीकधी एक्टोपिक गर्भधारणा शरीराच्या पोटात किंवा गर्भाशयाचा खालचा भाग म्हणजे सर्विक्समध्ये होते. सर्विक्स गर्भाशयाचा भाग असून तो योनीला जोडतो. परंतु, एक्टोपिक गर्भधारणा गर्भ पूर्ण कालावधीपर्यंत टिकू शकत नाही. तसेच वाढत्या ऊतीमुळे जीवघेणा रक्तस्त्राव होऊ शकतो.
अशी उघडकीस आली घटना
विर्शी येथील शेतकरी शंकर कावळे यांच्या शेळीच्या कासेवर सुजन व कास खुपच कडक झाले होते. शेळीचा गर्भधारणेचा कालावधी साधारणत: पाच महिन्यांचा असतो. परंतु, सहा महिन्यानंतरही शेळीची प्रसूत झाली नव्हती. याआधी तीन डॉक्टरांच्या औषधोपचारानंतरही सुजन कमी झाली नव्हती. त्यामुळे त्यांनी शेळीला दवाखान्यात तपासणीसाठी आणले. डॉ. गुणवंत भडके यांनी शेळीची तपासणी केली असता त्यांना कासेच्या (स्तनाच्या) जवळ पोटाखाली कडक सुजन व खराब वास येत असल्याचे लक्षात आले. शेतकऱ्याला विश्वासात घेत त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले.
नळीसारख्या वाहिनीने व्हायचा रक्तपुरवठा
शस्त्रक्रियादरम्यान शेळीच्या कासेला चिपकुन पोटाखालील ढिल्या असलेल्या चामडी खाली ( सबकुट्यनिअस जागा ) हे पिल्लू काहीसे सडलेल्या अवस्थेत मृत आढळून आले. पिल्लू एका आठ एमएम साईजच्या नळीसारख्या छिद्रांमधून रक्तवाहिनीने आतील अवयवाशी जुडलेले होते. परंतु, पिल्लाचा मातेच्या अन्य कोणत्याही अवयवाशी थेट संपर्क दिसुन आला नाही.
तर... वेळीच बचावले असते पिल्लू
शेळीच्या गर्भधारणेचा कालावधी पाच महिन्यांपेक्षा जास्त झाल्यामुळे पिल्लू मृत झाले होते. शेतकऱ्याने जर वेळेवर म्हणजे पाच महिन्याचे आत डॉक्टरांना दाखवले असते तर कदाचित पिल्लू जिवंत मिळाले असते. दवाखान्यात सोनोग्राफी व ईतर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे डॉक्टरांना सखोल अभ्यास करता आला नाही.
तर... 'सबक्युटानिअस बेबी' संकल्पनेची संभावना
गर्भाच्या वाढीसाठी गर्भाशय उपलब्ध नसला किंवा काही व्याधीमुळे गर्भाशय उपयोगी नसला तर चमडी खाली गर्भाची वाढ करणे शक्य होणार का ? या संशोधनाला या घटनेमुळे चालना मिळणार आहे. एखादे अवयव नैसर्गिकरित्या शरीरात सबकुट्यानिअसरित्या तयार करता येवू शकेल, अशी शक्यता संभव वाटते. आज टेस्ट ट्यूब बेबी गर्भाचे वाढीसाठी त्याला दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात ठेवावे लागत होते. परंतु, हे तंत्र विकसीत झाल्यास त्याच स्त्रीच्या सबक्युटानिअस जागेत गर्भ वाढविण्याची संभावना वाटते. त्या बेबीला 'सबक्यूटानिअस बेबी' असे म्हणू शकतो.
३० जून रोजी केलेल्या शस्त्रक्रियेला दोन तासाचा अवधी लागला. याकरीता हेमंत वगारे व विनायक वालके यांनी सहकार्य केले. आता शेळी पूर्णपणे ठिक आहे. पुढील दहा दिवस शेळीवर औषधोपचार सुरू राहणार असून काळजी घेण्यात येत आहे.
- डॉ. गुणवंत भडके, पशुधन विकास अधिकारी विर्शी.