शेतातील धूर देतायेत खरीप हंगामाचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:38 AM2021-05-25T04:38:49+5:302021-05-25T04:38:49+5:30
मोहाडी - पावसाळा तोंडावर आलेला आहे. रोहिणी नक्षत्राची सुरुवात मंगळवारपासून होत आहे. त्यामुळे शेतातील काडी-कचरा जाळण्याची तयारी शेतकरी करीत ...
मोहाडी - पावसाळा तोंडावर आलेला आहे. रोहिणी नक्षत्राची सुरुवात मंगळवारपासून होत आहे. त्यामुळे शेतातील काडी-कचरा जाळण्याची तयारी शेतकरी करीत आहेत. शिवारात निघणारा धूर शेतीच्या हंगामाच्या प्रारंभाची चाहूल देत आहे.
पर्जन्य नक्षत्राची सुरुवात रोहिणी नक्षत्रापासून सुरू होते. या नक्षत्रात शेतीच्या हंगामाची सुरुवात होते. कठीण संकट कोणतेही असो त्यावर मात करून, दुःखाची गाठोडी बांधून शेतकरी राजा शेतीच्या कामासाठी तयार झाला आहे. मे ते जानेवारी असे सतत आठ महिने राबणारा शेतकरी परंपरागत खरीप पिकांच्या (भात पीक) हंगामासाठी उत्सुक झाला आहे. त्यासाठी शेतात असणारा काडी कचरा पेटवला जात आहे. तूर पीक कापणीनंतर धुऱ्यावर असणाऱ्या तूर पिकाच्या काड्या व गवत जाळून नष्ट केले जात आहेत. तसेच शेतीत आपसूक वाढलेले बाभळी व अन्य झाडांची लहान रोप ही तणीस घालून पेटविली जात आहेत. यामुळे शेत - शिवारात धुराळे बघायला मिळत आहेत. गावच्या शिवाशेजारी प्रत्येक शेतकरी घरातील काडी- कचऱ्याचे खत तयार करीत असतो. शेतात वर्षभर तयार झालेला हा कंपोस्ट खत घालणे सुरू झाले आहे.
बाॅक्स
वैरणाची तजवीज
शेतात ढीग रचून जमा केला गेलेली वैरण घरी नेली जात आहे. ती वैरण पावसाने ओली होऊ नये म्हणून शेतकरी तण्स घरी आणत आहेत. घरी आणलेली तणस घराच्या धाब्यावर अथवा सुरक्षित ठिकाणी शेतकरी ठेवतात. त्यामुळे जनावरांचा पावसाळ्यात सुका चारा खायला मिळत असतो. तणसी शिवाय लाखोरी, गव्हाची वैरणही घरी साठवली जाते. अलीकडे शेतातील कामे यंत्रांनी केले जाते. त्यामुळे अनेक शेतकरी तणसाची विक्री करीत आहेत. तणस खरेदी करणारे अनेकजण खेडेगावात येत आहेत. खरेदी केलेली तणस ट्रकने नेली जात आहे. हे सगळे संकेत शेतीच्या हंगामाचे आहेत.
===Photopath===
230521\5135img_20210523_183505.jpg
===Caption===
शेतकरी शेतात काडी - कचरा जाळत असल्याने शेतात निघत असलेले धुरांडे