भरधाव ट्रकने पोलिसाला चिरडले
By admin | Published: March 27, 2016 12:17 AM2016-03-27T00:17:28+5:302016-03-27T00:17:28+5:30
न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून कर्तव्यावर जात असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने पोलीस हवालदारास चिरडले. ...
वीज कार्यालयासमोरील घटना : न्यायालयीन कर्तव्यावर जाताना अपघात
भंडारा : न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून कर्तव्यावर जात असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने पोलीस हवालदारास चिरडले. जखमी अवस्थेत नागपूरला नेत असताना त्यांचा दुदैवी अंत झाला. ही घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील वीज वितरण कार्यालयासमोर घडली.
शेषराव दिवान तितिरमारे (४८) रा. विद्यानगर, भंडारा असे मृतक पोलीस हवालदाराचे नाव आहे. मृतक शेषराव हे जवाहरनगर पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत होते. नित्याप्रमाणे सकाळी ते ठाण्यात हजर झाले. त्यांना शनिवारला भंडारा येथील जिल्हा सत्र न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून कर्तव्य बजवायचे होते, असे त्यांच्या सहकार्यांनी सांगितले. त्यामुळे ते न्यायालयीन कर्तव्यासाठी दुचाकी क्रमांक एमएच ३६ जे ४२६६ ने जवाहरनगर ठाण्यातून भंडारा येथील न्यायालयाकडे निघाले. दरम्यान नागपूरकडून भंडाराकडे येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक डब्ल्यू बी ११ सी ६३७५ ने दुचाकीवरील त्यांना जोरदार धडक दिली. यात दुचाकीसह महामार्गावर कोसळल्याने ते ट्रकखाली आले. यात त्यांच्या दोन्ही पायावरून ट्रकचे चाक गेल्याने गंभीररित्या जखमी झाले. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, चालकाने ट्रक घटनास्थळीच ठेवून पळ काढला. नागरिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना देत जखमी शेषराव यांना तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले. मात्र, पारडीजवळ त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व चार मुली असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ८ वाजता वैनगंगा नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी ट्रकचालकाविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. (शहर प्रतिनिधी)