पंधरा फुटाचा रस्ता झाला सात फुटांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2022 05:00 AM2022-03-18T05:00:00+5:302022-03-18T05:00:53+5:30

अतिक्रमण या समस्येला उग्ररूप देण्याचे कार्य रस्त्यावर दुकानदारी थाटणाऱ्यांनी  केले आहे. विशेष म्हणजे या अतिक्रमण करणाऱ्यांना टोकले किंवा रोखले असता, चक्क अरेरावी आणि गुंडगिरीची भाषा वापरली जाते. वेळप्रसंगी चाकुही काढला जातो. रस्ता आपण खरेदी केला आहे, या अविर्भावात बोलीभाषेचा वापर केला जातो. येथून दुचाकी नेणे म्हणजे कसरतच आहे. याबाबत पालिका प्रशासन तसेच वाहतूक पोलीस शाखा मूग गिळून का आहे, हे  न उलगडणारे कोडे आहे. 

Fifteen feet of road became seven feet | पंधरा फुटाचा रस्ता झाला सात फुटांचा

पंधरा फुटाचा रस्ता झाला सात फुटांचा

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अतिक्रमणाने गजबजलेल्या भंडारा शहरात मोठा बाजार परिसरही यातून सुटलेला नाही. मोठा बाजारातील बीएसएनएलच्या ग्राहक व सेवा केंद्र लागून असलेल्या लहान चौक ते बस स्टॉपकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्यावर अतिक्रमणाने कहर केला आहे. विशेष म्हणजे काही दुकानदारांनी साहित्य झाकण्यासाठी रस्त्यावरच चक्क हिरवी पाल ताणली आहे. रस्ताच आच्छादित करण्यात आलेला आहे. रस्त्यावर थाटलेल्या दुकानांमुळे पंधरा फुटांचा रस्ता आता अवघ्या सात फुटांचा राहिला आहे.
 अशा स्थितीत अपघात घडणार, यात शंकाच उरली नाही. अतिक्रमण या समस्येला उग्ररूप देण्याचे कार्य रस्त्यावर दुकानदारी थाटणाऱ्यांनी  केले आहे. विशेष म्हणजे या अतिक्रमण करणाऱ्यांना टोकले किंवा रोखले असता, चक्क अरेरावी आणि गुंडगिरीची भाषा वापरली जाते. वेळप्रसंगी चाकुही काढला जातो. रस्ता आपण खरेदी केला आहे, या अविर्भावात बोलीभाषेचा वापर केला जातो. येथून दुचाकी नेणे म्हणजे कसरतच आहे. याबाबत पालिका प्रशासन तसेच वाहतूक पोलीस शाखा मूग गिळून का आहे, हे  न उलगडणारे कोडे आहे. 

हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलीस चौकी  
- भंडारा जिल्ह्याची वाहतूक व्यवस्था ज्यांच्या खांद्यावर आहे, त्यांचेच कार्यालय पोस्ट ऑफिस चौकात आहे. अतिक्रमीत रस्त्याहून अवघ्या पन्नास मीटर अंतरावरच जिल्हा वाहतूक शाखेचे कार्यालय आहे; मात्र त्यांनाही ती समस्या दिसत नाही. याचेही नवलच वाटायला हवे. वाहतूक कार्यालयासमोरील जागा मोकळी ठेवली जाते; मात्र बाजारातील अन्य अतिक्रमण दिसत नाही, हाच मोठा नवलाचा विषय आहे. रस्त्यावर उभारलेल्या आच्छादनाने एखाद वेळी मोठा अपघात घडू शकतो, असे असतानाही याकडे कानाडोळा हाेत आहे.

जप्तीची कारवाई हवी 
- रस्त्यावर साहित्य ठेवून रस्ताच गिळंकृत करण्याचा सपाटा लावला आहे. साहित्य खरेदीसाठी येणारे ग्राहकही तिथेच उभे राहून जीव धोक्यात घालून  खरेदी करतात. एकंदरीत या रस्त्यावर कुठेही पार्किंग नाही. उन्हापासून बचाव करण्याकरिता पाल आणि छत्री उभारण्यात आली आहे. छत्रीचे टोक  डोक्याला किंवा कदाचित डोळ्यात खुपसू शकते. व्यवसाय करण्याला विरोध नाही; पण रस्ता गिळंकृत करण्याचा अधिकार कुणी दिला. रस्ता सर्वसामान्य रहदारीचा आहे तो मोकळा करून देणे, ही प्रशासनाची तितकीच नैतिक जबाबदारी असून, यावर बोलण्यापेक्षा जप्तीची कारवाई केली पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे.

 

Web Title: Fifteen feet of road became seven feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.