मोहाडी नगरपंचायत उपाध्यक्ष निवडणुकीत रंगला राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 11:47 AM2023-01-10T11:47:53+5:302023-01-10T11:50:00+5:30
अधिकृत उमेदवार पराभूत : बंडखोर सचिन गायधने विजयी
सिराज शेख
मोहाडी (भंडारा) : नगरपंचायत उपाध्यक्ष निवडणुकीत सोमवारी विचित्र संयोग घडून आला आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला. यात राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार मनीषा गायधने पराभूत झाल्या तर राष्ट्रवादीचे बंडखोर सचिन गायधने विजयी झाले. आता पक्षादेश झुगारणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
मोहाडी नगरपंचायतीत भाजपचे नऊ, राष्ट्रवादीचे सहा, आणि काँग्रेसचे दोन सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. मात्र, भाजपमध्ये दोन गट पडले असून एका गटात पाच तर दुसऱ्या गटात चार सदस्य आहेत. उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपच्या एका गटाच्या समर्थनाने राष्ट्रवादी काँग्रेसने मनीषा गायधने यांना अधिकृत उमेदवार घोषित केले. मात्र, या निवडणुकीमुळे राष्ट्रवादीमध्येसुद्धा दोन गट पडले. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाने सचिन गायधने यांचा अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचेच दोन उमेदवार उभे ठाकल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी १० विरुद्ध ७ मताने सचिन गायधने विजयी झाले.
राष्ट्रवादीचे गायधने यांना राष्ट्रवादीच्या रेखा हेडाऊ, वंदना पराते, सुमन मेहर यांनी साथ दिली तर भाजपच्या एका गटाचे ज्योतिष नंदनवार, छाया डेकाटे, सविता साठवणे, दिशा निमकर तसेच काँग्रेसचे महेश निमजे व देवश्री शहारे यांनी पाठिंबा दर्शविल्याने त्यांना १० मते मिळाली. राष्ट्रवादीच्या मनीषा गायधने यांना राष्ट्रवादीचे पवन चव्हाण व भाजपच्या दुसऱ्या गटाचे शैलेश गभने, हेमचंद पराते, यादवराव कुंभारे, पूनम धकाते, अश्विनी डेकाटे यांनी पाठिंबा दिल्याने ७ मते प्राप्त झाली.
राष्ट्रवादीचे झाले दोन गट
उपाध्यक्ष निवडणुकीने राष्ट्रवादीचे दोन गट पडून एका गटात ४ तर दुसऱ्या गटात २ सदस्य विभागले गेले. राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे यांनी व्हीप जारी केला होता; परंतु बंडखोर चार सदस्यांनी तो व्हीप फेटाळला, हे विशेष. या उपाध्यक्ष निवडणुकीवरून राष्ट्रवादीची अंतर्गत घुसफूस चव्हाट्यावर आली आहे. मात्र, स्वार्थाच्या राजकारणामुळे नगरसेवकावरून जनतेचा विश्वास उडालेला असून, या अभद्र युतीची चर्चा दिवसभर सुरू होती.
सचिन गायधने यांना रात्री चर्चेसाठी बोलाविले होते, त्यांनी येऊन बहुमत त्यांच्याकडे असल्याचे सांगायला हवे होते. निर्णय बदलता आला असता. बंडखोरी करणाऱ्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल.
- नाना पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी