जिल्ह्यातील ६३६ गावांची अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:24 AM2021-01-01T04:24:29+5:302021-01-01T04:24:29+5:30
भंडारा : जिल्ह्यातील ८८४ गावांपैकी ६३६ गावांची अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी असून २०८ गावांची पैसेवारी ५० पेक्षा अधिक ...
भंडारा : जिल्ह्यातील ८८४ गावांपैकी ६३६ गावांची अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी असून २०८ गावांची पैसेवारी ५० पेक्षा अधिक आहे. तर ४० गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही. खरीप हंगामात पिकांची अंतिम पैसेवारी ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असते. ५० पेक्षा कमी पैसेवारी असेल तर शासनाकडून जिल्ह्याला काही प्रमाणात सवलती मिळतात. यावर्षी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि महापूर आल्यानंतरही २०८ गावांची पैसेवारी ५० पेक्षा अधिक आली आहे.
भंडारा जिल्ह्यात एकूण गावांची संख्या ८९८ आहे. त्यात खरीप गावांची संख्या ८८४ असून महसूल विभागाने ८४४ गावांची पैसेवारी घाेषित केली आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या स्वाक्षरीने अंतिम पैसेवारीचे विवरण पत्र जाहीर करण्यात आले आहे. ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये भंडारा तालुक्यातील १२३, पवनी ८९, तुमसर ९५, माेहाडी ४४, साकाेली ९४, लाखांदूर ८९, लाखनी १०२ गावांचा समावेश आहे तर ५० पेक्षा अधिक पैसेवारी असलेल्या गावांमध्ये भंडारा तालुक्यातील ४४, पवनी ५२, तुमसर ४८, माेहाडी ६४ गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे साकाेली, लाखांदूर आणि लाखनी तालुक्यात एकही गाव ५० पेक्षा अधिक नाही.
५० पेक्षा कमी पैसेवारीअसलेल्या गावांना सवलती मिळतात. यात जमीन महसुलात सुट, शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली सक्तीने न करणे, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, नरेगाच्या टंचाई कामांना प्राधान्य, शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करणे आदींचा समावेश असताे. याचा लाभ जिल्ह्यातील ६३६ गावांना मिळणार आहे. जिल्ह्यातील ४० गावाची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही. ही गावे पाण्याखाली, अकृषक आणि प्रकल्पांतर्गत आहेत. त्यात भंडारा २१, पवनी ७, तुमसर ८, साकाेली २ आणि लाखनी तालुक्यातील दाेन गावांचा समावेश आहे.
बाॅक्स
दुष्काळी वर्ष तरीही पैसेवारी अधिक
जिल्ह्यात यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती हाेती. सुरुवातीला अतिवृष्टी आणि महापुराने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले. त्यानंतर तुडतुड्यासह विविध किडींनी धान फस्त केले. धानाचा उतारा निम्म्यापेक्षा कमी आला आहे. अशा स्थितीत संपूर्ण जिल्हा ५० पेक्षा कमी राहील, अशी अपेक्षा हाेती. मात्र चार तालुक्यातील २०८ गावांची पैसेवारी ५० पेक्षा अधिक आली. त्यामुळे यागावातील शेतकऱ्यांना सवलती मिळणे कठीण जाणार आहे.
तालुका ५० पेक्षा कमी ५० पेक्षा अधिक
भंडारा १२३ ४४
पवनी ८९ ५२
तुमसर ९५ ४८
माेहाडी४४ ६४
साकाेली ९४ ००
लाखांदूर ८९००
लाखनी १०२ ००