अखेर ढिवरवाडा येथे ६७० जनावरांवर औषधोपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:42 AM2021-09-04T04:42:12+5:302021-09-04T04:42:12+5:30
करडी(पालोरा):- बेटाळा जिल्हा परिषद क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनावरांवर तोंडखुरी, पायखुरी व घटसर्प रोगांची लागण होऊन मृत्यू वाढल्याची माहिती सरपंच ...
करडी(पालोरा):- बेटाळा जिल्हा परिषद क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनावरांवर तोंडखुरी, पायखुरी व घटसर्प रोगांची लागण होऊन मृत्यू वाढल्याची माहिती सरपंच धामदेव वनवे यांनी वारंवार मुख्यमंत्री पशुसंवर्धन योजनेच्या टोल फ्री क्रमांकावर दिली. अधिकाऱ्यांनी लसीकरणाचे आश्वासनही दिले परंतु आठवडा लोटूनही प्रारंभ झालेला नव्हता तेव्हा सरपंचांची कैफियत ‘लोकमत’च्या माध्यमातून समस्या रेटून मांडताच ढिवरवाडापासून लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. ढिवरवाडा येथे ५०० जनावरांचे लसीकरण, १५० जनावरांवर उपचार तर २० जनावरांची गर्भ तपासणी व औषधोपचार करण्यात आले.
जनावरांना पायखुरी, तोंडखुरी, घटसर्प व अन्य रोगांची लागण होऊन जनावरे चारा-पाणी पित नाही. शासकीय डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे पशुपालक परिसरातील खासगी डॉक्टरांकडून औषधोपचार करत आहेत. तरीही किंमती व दुभती जनावरे दगावत असल्याने धामदेव वनवे यांनी सरपंच या नात्याने राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री पशुसंवर्धन योजनेच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला. जनावरांची गंभीर स्थिती व पशुपालकांच्या वेदना अधिकाऱ्यांच्या कानावर वारंवार टाकल्या. संबंधितांनी लसीकरणासाठी होकारही दिला; परंतु आठवडा लोटूनही पशुविभागाच्या एकाही अधिकाऱ्याने परिसरात येण्याचे व पशुपालकांची भेट घेण्याचे सौजन्य दाखविले नाही.
जनावरांचे तडफडून होणारे मृत्यू व पशुपालकांची ओरड वाढल्याने त्यांनी परिसराची कैफियत 'लोकमत'च्या माध्यमातून जनतेच्या दरबारात दमदारपणे मांडली. तत्काळ लसीकरण सुरू करावे, अन्यथा आणखी जनावरांचा मृत्यू झाल्यास त्यास पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून जनआंदोलन उभारले जाईल, या दरम्यान काही गैरप्रकार झाल्यास त्यास पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील, असा कडक इशारा धामदेव वनवे यांनी दिली होता तेव्हा कुठे ३१ ऑगस्टला ढिवरवाडापासून लसीकरण शिबिरास प्रारंभ करण्यात आला. शिबिरात पशुधन विकास अधिकारी डॉ. उपवंशी यांनी ६७० जनावरांचे रोगनिदान व औषधोपचार केले. पशुसेवक नंदूरकर, बादल लांडगे, कर्मचारी सपाटे यांनी शिबिरासाठी सहकार्य केले. यावेळी पशुपालकांनी 'लोकमत'चे विशेष आभार मानले.
कोट
'' वैनगंगा नदी पलीकडील बेटाळा जि. प. क्षेत्रातील प्रत्येक गावात आठवड्याभरात रोगनिदान, लसीकरण व औषधाचार शिबिर लावले जातील, नागरिकांनी शिबिरांचा लाभ घ्यावा,
- डॉ. प्रियंका भिवगडे, पशुसंवर्धन उपायुक्त मोहाडी.
030921\img-20210831-wa0120.jpg~030921\img-20210831-wa0117.jpg
गर्भ तपासणी करतांना डॉ. उपवंशी~शेळ्या वर उपचार