अखेर ५५ दिवसानंतर एसडीओ कार्यालयातील तांत्रिक अडचण दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:07 AM2021-02-06T05:07:10+5:302021-02-06T05:07:10+5:30
मुखरु बागडे पालांदूर : तांत्रिक अडचणीमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे विविध दाखले साकोली उपविभागीय अधिकारी कार्यालयात अडले होते. याबाबत ‘लोकमत’ने ...
मुखरु बागडे
पालांदूर : तांत्रिक अडचणीमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे विविध दाखले साकोली उपविभागीय अधिकारी कार्यालयात अडले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच प्रशासनात खळबळ उडाली. अखेर ५५ दिवसानंतर साकोली एसडीओ कार्यालयातील तांत्रिक अडचण दूर झाली आणि विद्यार्थ्यांना विविध दाखले मिळण्याचा मार्ग सुकर झाला.
साकोली उपविभागीय कार्यालयांतर्गत साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यातील विद्यार्थ्यांची सहा हजार प्रकरणे गत १० डिसेंबरपासून प्रलंबित होती. त्यात नॉन क्रिमिलेअर अधिवास प्रमाणपत्रासह विविध दाखल्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून प्रकरण सादर केले होते. परंतु ऑनलाईन प्रक्रियेत तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यामुळे विद्यार्थी, पालक चिंतेत सापडले होते. याबाबत लोकमतने २३ जानेवारी रोजी ‘विद्यार्थ्यांचे दाखले ४० दिवसापासून एसडीओ कार्यालयात अडले’ असे वृत्त प्रकाशित केले होते. त्यावरून प्रशासन खडबडून जागे झाले. आता तब्बल ५५ दिवसानंतर ही समस्या दूर झाली. शासनाने तांत्रिक समस्या दूर करीत प्रमाणपत्र निर्गमित केले. त्यामुळे पालक आणि शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
बॉक्स
पालांदूरमधील दोन हजार प्रकरणांचा समावेश
साकोली उपविभागीय कार्यालयात लाखनी तालुक्यातील एकट्या पालांदूरमधील दोन हजार प्रकरणे पेंडिंग होती. प्रशासनाने ऑफलाईन प्रकरणे स्वीकारण्याची सुविधा दिली होती. परंतु पालकांचा त्याकडे कल नव्हता. आता ही समस्या दूर झाल्याचे सेतू सुविधा केंद्राचे संचालक अशोक खंडाईत यांनी सांगितले.