अखेर ७४ वर्षांनंतर बेलदार समाजाला मिळाले जात प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:36 AM2021-08-15T04:36:29+5:302021-08-15T04:36:29+5:30
भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून ७४ वर्षांचा कालावधी लोटला असून, साकोली वास्तव्याला असलेला बेलदार समाज स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही समाजापासून उपेक्षित ...
भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून ७४ वर्षांचा कालावधी लोटला असून, साकोली वास्तव्याला असलेला बेलदार समाज स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही समाजापासून उपेक्षित व दुर्लक्षित आहे. बेलदार समाजाला समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी समाजाचे युवा व सुशिक्षित वर्ग याबाबत नेहमी व वारंवार शासन दरबारी आपला मुद्दा मांडत असतात; पण बेलदार समाजाकडे प्रखर नेतृत्व नसल्यामुळे समाज आजही उपेक्षित आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून अन्यायग्रस्त असलेल्या बेलदार समाजाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भटक्या-विमुक्त कल्याण परिषदेच्या प्रयत्नातून अखेर यश मिळाले. १२ ऑगस्टला ४० समाज बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. बेलदार समाजातील मुला-मुलींना विद्यार्थी व बेरोजगार तरुणांना शिक्षण व नोकरीसाठी आवेदन करताना अत्यंत त्रास सहन करावा लागत असे, परंतु भटक्या विमुक्त कल्याणकारी परिषदेने या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासन दरबारी पाठपुरावा करून न्याय मिळवून दिला.
बेलदार समाजाच्या मुला-मुलींना व बेरोजगार तरुणांना भटके-विमुक्त कल्याणकारी परिषद राष्ट्रीय अध्यक्ष दुर्गादास व्यास यांच्या अध्यक्षतेखाली तथा साकोलीचे तहसीलदार रमेश कुंभरे यांच्या हस्ते बेलदार समाज बांधवांना जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. याप्रसंगी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणारे परिषदेचे राज्यप्रमुख दिलीप चित्रीवेकर, जिल्हा प्रचारक राहुल आवरकर, कैलास पटले, महेंद्र गोबाडे, शामराव शिवणकर उपस्थित होते. संचालन रोशन बोकडे यांनी केले. भटके-विमुक्त कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था तालुकाप्रमुख शरद सोनकुसरे, बस्ती प्रमुख घनश्याम भोपळे, पालावरची शाळा आचार्य रंजू सोनकुसरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सिमल बोकडे, बलराज स्वर्गते, तीलक सोनकुसरे, गोपाल लोहिया, कमल बोकडे, शिवा बोकडे, अण्णा सोनकुसरे, आनंद सोडते, सम्मी बोकडे, रोहित धकाते, ज्वाला सोनकुसरे, कृष्णा दुखिया, राजेश सॉरी तथा बेलदार समाजाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.