अखेर बारिया, शिंदे कुटुंबीयांना मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:53 PM2018-06-30T22:53:12+5:302018-06-30T22:53:42+5:30

तीन वर्षापूर्वी दरोडा आणि खुनाच्या प्रकरणाने भंडारा शहरात खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, तीन वर्षांनंतर आज शनिवारला या प्रकरणातील दोन क्रूर आरोपींविरूद्ध जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजय देशमुख यांनी फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात नागरिकांनी शनिवारला गर्दी केली होती.

Finally Baria, the Shinde family got justice | अखेर बारिया, शिंदे कुटुंबीयांना मिळाला न्याय

अखेर बारिया, शिंदे कुटुंबीयांना मिळाला न्याय

Next
ठळक मुद्देजिल्हा सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल : आता सोनी हत्याकांडाच्या निकालाची प्रतीक्षा

नंदू परसावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तीन वर्षापूर्वी दरोडा आणि खुनाच्या प्रकरणाने भंडारा शहरात खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, तीन वर्षांनंतर आज शनिवारला या प्रकरणातील दोन क्रूर आरोपींविरूद्ध जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजय देशमुख यांनी फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात नागरिकांनी शनिवारला गर्दी केली होती. न्यायालयाच्या निर्णयाने बारिया व शिंदे कुटुंबीयांना न्याय मिळाला, अशा प्रतिक्रिया उपस्थितांमध्ये होत्या.
३० जुलै २०१५ रोजी म्हाडा कॉलनीतील शिंदे यांच्या घरी प्रवेश करून आमिर शेख व सचिन राऊत या आरोपींनी अश्विनीवर जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणात न्यायालयाने ३१ साक्षदार तपासले. शुक्रवारला न्या.देशमुख यांनी दोन्ही आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. यावेळी सरकारी वकील अ‍ॅड.दुर्गा तलमले यांनी युक्तीवाद केला. दरम्यान, शनिवारला सकाळी प्रीती बारिया खून प्रकरण व भव्य बारिया जीवघेणा हल्ला प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली. या प्रकरणात न्यायालयाने २६ साक्षदार तपासले. त्यानंतर न्या.देशमुख यांनी या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. यावेळी सरकारी वकील अ‍ॅड.प्रमोद भुजाडे यांनी युक्तीवाद केला.
निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात गर्दी
प्रीती बारीया खून प्रकरणाचा निकाल यापूर्वी दोनवेळा पुढे ढकलण्यात आला होता. या निकालाची उत्सुकता असल्यामुळे शनिवारला सकाळी ११.०० वाजतापासूनच न्यायालयात गर्दी होऊ लागली होती.
न्या.देशमुख यांनी सरकारी वकिलाचे व आरोपीच्या वकिलांचे म्हणणे एैकून घेतले. यावेळी आरोपीच्या वकिलाने या दोघांवर यापूर्वी कोणताही गुन्हा नाही. त्यांच्या वयाचा विचार करून जन्मठेपेची शिक्षा देण्याची विनंती केली. परंतु बारीया यांचे वकील अ‍ॅड.राजेश राऊत यांनी या घटनेनंतर कधीही अशा घटना घडल्या नाहीत, असे सांगून हे आरोपी सुटले तर समाजासाठी घातक ठरतील, असा युक्तीवाद केला. त्यानंतर न्या.देशमुख यांनी दुपारी १.३० वाजता फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय दिला. फाशीची शिक्षा होऊनही गुन्हा केल्याची भीती आरोपींच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती.
यापूर्वी तीन प्रकरणात फाशीची शिक्षा
यापूर्वी भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाने २००५ मध्ये केशोरी हत्याकांड प्रकरणात एका आरोपी पोलीस कर्मचाºयाला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर २९ सप्टेंबर २००६ रोजी घडलेल्या खैरलांजी हत्याकांड प्रकरणात न्या.एस.एस. दास यांनी १५ सप्टेंबर २००८ रोजी सहा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर ३० जुलै २०१५ रोजी घडलेल्या प्रीती बारीया हत्याकांड प्रकरणात न्या.संजय देशमुख यांनी ३० जून २०१८ रोजी दोन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तुमसर येथील सोनी हत्याकांड प्रकरणाचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे. आता या निकालाकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
नितू पशिने खून खटला सुरू
भंडारा येथे जिवघेणा हल्ला करण्यापूर्वी या दोन आरोपींनी १० जून २०१५ रोजी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी (मोरगाव) येथील नितू पशिने यांच्या घरी एसी दुरूस्तीच्या बहान्याने प्रवेश करून त्यांचा हातोडीने खून केला होता. हे प्रकरण गोंदिया जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही.
एटीएममुळे सापडले होते आरोपी
जिवघेणा हल्ल्यात अश्विनी बेशुद्ध होताच आरोपींनी घरातील सोन्याचे दागिणे, एमटीएम कार्ड चोरून नेले होते. याच कार्डवर पासवर्ड लिहून होता. त्यानंतर आरोपींनी बेला येथील ओव्हरसीस बँकेच्या एटीएममधून पैसे काढले. पैसे काढल्याचा संदेश अश्विनीच्या वडिलाच्या मोबाईलवर आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. तत्कालीन पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक प्रशांत कोलवाडकर यांना तपासाचे निर्देश दिले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या दोन्ही आरोपींना त्याच रात्री अटक केली. सकाळी आमिरच्या घरून खूनात वापरलेली हातोडी जप्त केली होती.
जखमा कशा भरून निघणार? -रूपेश बारिया
न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे प्रीती बारिया यांचे पती रूपेश बारीया यांनी समाधान व्यक्त करतानाच भव्यच्या जखमा कधीही भरून न निघणाºया असल्याचे सांगितले. डोक्यावर गंभीर जखमांमुळे नागपूर येथील मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये भव्यवर दोनदा शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर अहमदाबादमध्ये पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आली. भव्य आजही स्वत: चालू शकत नाही. त्याला बोलताही येत नाही. तो कुणालाही ओळखू शकत नाही. त्याच्यावर आजही उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४४ लाख रूपये खर्च झाले. अहमदाबाद येथे डॉ.परिमल त्रिपाठी यांना या घटनेबाबत सांगितल्यामुळे त्यांनी फी घेण्याचे नाकारून उपचार करीत आहेत. भव्यला आता आयुष्यभर या वेदना सोसाव्या लागणार असल्याचे सांगत रूपेश बारीया यांचे डोळे पाणावले होते.
पत्नीच्या आठवणीने रूपेश बारियांना अश्रू अनावर
सकाळी ११.३० वाजता न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर न्या.देशमुख यांनी दुपारी १.३० वाजता दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. सुनावणीदरम्यान मृत प्रीती बारीया यांचे पती रूपेश बारीया हे निकाल एैकण्यासाठी न्यायाधिशांच्या कक्षातच होते. निकाल एैकताच त्यांनी समाधान व्यक्त करीत कक्षाबाहेर पडले. त्यानंतर आप्तांशी बोलताना त्यांना अश्रु अनावर झाले होते.

प्रीती बारीया खून प्रकरणात परिस्थितीजन्य पुरावे होते. जे कधीही बदलत नाहीत. या प्रकरणात २६ साक्षदार तपासण्यात आले. त्यातील एकही आरोपी फितूर नव्हता. ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ अशी होती. या निकालाने बारीया कुटुंबीयांना न्याय मिळाला.
- राजेश राऊत, बारीया यांचे वकील.

या आरोपींची गुन्ह्याची पद्धत सारखी होती. ते कोणताही पुरावा सोडत नव्हते. अटकेनंतरही त्यांना गुन्हा केल्याची भीती नव्हती. आजच्या या निर्णयाने केलेल्या कामाचे समाधान मिळाले आहे.
- दिलीप झळके,
तत्कालीन पोलीस अधीक्षक.

Web Title: Finally Baria, the Shinde family got justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.