अखेर कोरोनायोद्ध्यांच्या उपोषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:36 AM2021-08-15T04:36:51+5:302021-08-15T04:36:51+5:30
भंडारा : जिल्ह्यातील कोरोनायोद्ध्यांनी न्यायाच्या मागणीसाठी त्रिमूर्ती चौक येथे २ ऑगस्टपासून उपोषण सुरु केले होते. भंडारा वैनगंगा बचाव अभियानाचे ...
भंडारा : जिल्ह्यातील कोरोनायोद्ध्यांनी न्यायाच्या मागणीसाठी त्रिमूर्ती चौक येथे २ ऑगस्टपासून उपोषण सुरु केले होते. भंडारा वैनगंगा बचाव अभियानाचे प्रमुख नितीन तुमाने यांनी योद्ध्यांची बाजू लावून धरली. खासदार सुनील मेंढे, आमदार परिणय फुके, आमदार नागो गाणार यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन चर्चा केली. त्यानंतर थेट मुंबई येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमोर योद्ध्यांच्या समस्या मांडल्या. शेवटी आरोग्यमंत्र्यांनी मागण्या मंजूर केल्या असून, गुरुवारी हे उपोषण मागे घेण्यात आले.
कोरोनायोद्ध्यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता सामान्य रुग्णालय भंडारा येथे कोरोनाकाळात रुग्णांची सेवा केली. पण त्यांना कामावरून कमी केल्याने रस्त्यावर येऊन उपोषण करण्याची वेळ आली. तेव्हा योद्ध्यांनी २ ऑगस्ट पासून थांबलेला पगार मिळाला पाहिजे, नियमित सेवेत रुजू करून घ्यावे, सर्व कोरोना रुग्ण सेवक-सेविकांना विमा मिळाला पाहिजे, कोरोना रुग्ण सेवकांचा सन्मान झाला पाहिजे, भविष्यात जेव्हा सफाई कामगारांची भरती निघाल्यास कोरोना सेवकांना आरक्षण मिळाले पाहिजे या मागण्यांचे निवेदन प्रशासनामार्फत आरोग्य विभागाला पाठविले होते. उपोषणकर्ते अजय खोडकर, राजश्री खोडकर, भावना खोडकर, मोहन सतदेवे, प्रिया चव्हाण, योगीता शहारे, पूजा बावनउके, गीता निनावे, मुकेश निखारे, संदीप पडोळे, निखिलेश कावळे, विशाल गजभिये, जतीन टेंभेकर, अरविंद मुलुंडे, रत्नदीप मेश्राम, विवेक सार्वे, सुहास बागडे, रामलाल तिरपुडे, गौतम बागडे, प्रतिमा तांडेकर, सचिन लुटे, योगीता सत्यमेश्राम, अमर बावणे, मयूर डोंगरे, पुरुषोत्तम खापेकर, आमीर पठाण, साहिल वाघमारे यांनी आरोग्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले. वैनगंगा अभियान समिती प्रमुख नितीन तुमाने यांनी कोरोना योद्ध्यांच्या समस्या आमदार परिणय फुके यांच्यासह पालकमंत्र्यांना सांगितल्या. त्यानंतर तुमाने हे उपोषणकर्त्यांसोबत मुंबईला गेले होते. परिणय फुके यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. आरोग्यमंत्र्यांनी याबाबत आश्वासन दिले. या उपोषणाला बावणे कुणबी समाज, युवा समिती यांच्यासह विविध संघटना व पक्षांकडून पाठिंबा मिळाला होता.