अखेर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या मागणीला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:35 AM2021-03-21T04:35:07+5:302021-03-21T04:35:07+5:30
कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह विदर्भातील सर्व शाळा मागील मार्च महिन्यापासून बंद होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ...
कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह विदर्भातील सर्व शाळा मागील मार्च महिन्यापासून बंद होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू होते; मात्र तात्पुरता कोरोना नियंत्रणात आला असल्यामुळे नुकत्याच ९ ते १२ तसेच ५ ते ८वीच्या नियमित शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यामुळे नागरिक बिनधास्त झाले. कोरोना नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढताना दिसत आहे. नुकत्याच सुरू झालेल्या विदर्भातील अनेक जिल्ह्यातील शाळा बंद करण्याची वेळ ओढवली आहे. त्यामुळे दहावी व बारावीच्या परीक्षा होणार की नाही. आपल्या पाल्याचे वर्ष वाया तर जाणार नाही, अशी पालकांची चिंता वाढली होती.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच केंद्रावरील गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सध्या ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहेत. त्याच शाळेत दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्यास विद्यार्थी, पालक व शिक्षकांची गर्दी होणार नाही. यासाठी शाळेतच परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी विदर्भ माध्य. शिक्षक संघाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा शाळास्तरावर घेण्याबाबत निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी २० मार्च रोजी विद्यार्थ्यांना परीक्षेकारिता अधिक वेळ मिळावा, परीक्षा केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी दहावी बारावीच्या परीक्षा शाळा स्तरावर घेऊन फिजिकल अंतर पाळण्यासाठी आवश्यकता भासल्यास नजीकच्या शाळेच्या वर्ग खोल्या घेण्याची घोषणा घोषणा केली आहे.
राज्य शासनाने विमाशीच्या निवेदनाची दखल घेतल्यामुळे कार्यवाह राजेश धुर्वे, जिल्हध्यक्ष सुधाकर देशमुख, चंद्रशेखर रहांगडाले, विलास खोब्रागडे, पुरुषोत्तम लांजेवार, अशोक बनकर, दारासिंग चव्हाण, धीरज बांते, अनिल कापटे, मनोज अंबादे, धनवीर काणेकर, अनंत जायभाये, पंजाब राठोड, जागेश्वर मेश्राम इत्यादींनी राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांचे आभार मानले.
कोट बॉक्स
वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव व परीक्षा केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षा शाळा स्तरावर घेण्याची संघटनेची मागणी होती. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी विमाशीच्या मागणीची दखल घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थी पालक व शिक्षकांना परीक्षासंदर्भात मोठा दिलासा मिळाला आहे.
राजेश धुर्वे, जिल्हा कार्यवाह
विमाशि संघ, भंडारा.