अखेर किटाडीतील ग्रामपंचायतीचा 'आरो' पुर्ववत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:41 AM2021-03-01T04:41:14+5:302021-03-01T04:41:14+5:30
पालांदूर लाखनी तालुक्यातील किटाडी येथील ग्रामपंचायतीच्या आरो मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करण्याची वेळ आली ...
पालांदूर लाखनी तालुक्यातील किटाडी येथील ग्रामपंचायतीच्या आरो मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करण्याची वेळ आली होती. मात्र, ग्रामपंचायतीने वेळीच उपाययोजना करून आरो मशीनमधील तांत्रिक बिघाड दूर केल्याने ग्रामस्थांची होणारी धावपळ आता थांबली आहे.
ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे, याकरिता किटाडी येथे आरो प्लांट लावण्यात आलेला आहे. मात्र, गत दोन आठवड्यांपासून आरो मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आरो मशीन बंद होती. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत होती. प्रकरण ग्रामपंचायतीच्या डोळ्यासमोर असूनही दुर्लक्ष होत होते. ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता किटाडीतील ग्रामपंचायतीचा आरो बंद या आशयाचे वृत्त लोकमतने २४ फेब्रुवारी रोजी प्रकाशित केले होते.
लोकमतच्या वृत्ता दखल घेत दुरुस्तीकरिता पत्र व्यवहार केल्याचे व येत्या तीन चार दिवसांत दुरुस्तीचे नियोजन केल्याचे ग्रामसेवक जय आकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आरो मशीनमधील तांत्रिक बिघाड तत्काळ दूर केला असून, शुद्ध व स्वच्छ पाणी मिळत आहे.
आरोचे शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्याची सवय जडल्याने इतर ठिकाणचे पाणी चवदार लागत नव्हते. परिणामी आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता होती. प्रसंगी बाहेरगावाहूनसुध्दा आरोचे पाणी आणण्यासाठी जावे लागत होते. मात्र, ग्रामपंचायतीने तत्परता दाखवित आरो मशीन तत्काळ दुरुस्त केले आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, असे किटाडी ग्रामवासीयांनी सांगितले.