अखेर चौकशी समितीने केली आहाराची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 01:03 AM2019-07-10T01:03:23+5:302019-07-10T01:06:25+5:30
पवनी तालुक्यातील पिलांद्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा दिला जातो, याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच एकच खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेत चौकशी समितीने पोषण आहाराची चाचपणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : पवनी तालुक्यातील पिलांद्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा दिला जातो, याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच एकच खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेत चौकशी समितीने पोषण आहाराची चाचपणी केली. यात चुका आढळल्याची माहिती आहे.
यावेळी यामध्ये जिल्हा लेखाधिकारी मिनाक्षी शिवलकर, अधीक्षक शालेय पोषण आहार (पवनीचे) रविंद्र सलामे, विषय शिक्षक मिना गजभिये, केंद्र प्रमुख बी.आर. मेश्राम, विषयसाधन व्यक्ती व्ही.बी. रामटेके आदी अधिकारी यांनी शाळेतील वर्गावर्गात जावून चौकशी केली. तसेच रेकार्ड सुद्धा यावेळी तपासणी केली. चौकशीअंती व प्रभारी मुख्याध्यापक यांनी दिलेल्या लिखित पत्रानुसार तसेच अहवालानुसार योग्य ती कार्यवाही होणार असल्याचे मत यावेळी अधीक्षक रविंद्र सलामे पोषण आहार यांनी मांडले. शाळेतील कारभार विषयी चौकशी पाहणी केली. त्यात एक ना अनेक लहान मोठ्या त्रृट्या आढळल्या, रेकार्ड बरोबर नसल्याचेही आढळले. शासनातर्फे आलेला निधीचा वापरही झाला नसल्याचे बँक पासबुक वरून कळले. प्रभारी मुख्याध्यापकाच्या मते, धनादेशावर स्वाक्षरी करायला येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष टाळाटाळ करतात. त्यामुळे पैसे विड्राल झाले नाही तर मुख्याध्यापक बिल आणत नाही आणि दाखवत नाही म्हणून स्वाक्षरी करत नसल्याची कबुली शालेय समिती अध्यक्षांनी दिली.
आलेल्या समितीद्वारे प्रभारी मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षकांना समज देण्यात आली. विद्यार्थ्यांना यापुढे पोषण आहार दर्जेदार तथा नियमानुसार द्यावे, असेही सांगण्यात आले.
ज्या प्रभारी मुख्याध्यापकावर ग्रामस्थांचा रोष होता त्यानेही यावेळी लिखित स्वरूपात वरिष्ठांना पत्र दिले. याच शाळेतील पुन्हा एक मोठा प्र्रकार प्रकाशात आला तो विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आलेले शैक्षणिक साहित्य आजपर्यंत कुलूपबंद होते. आजपर्यंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्यापासून वंचित राहावे लागले आहे. या साहित्याचा उपयोग शिक्षक तथा मुख्याध्यापक करत नसतील तर यात दोष कुणाचा, असाही सवाल उपस्थित करण्यात आला.
शाळेत आलेल्या चौकशी समितीने घेतलेल्या निर्णयामुळे ग्रामस्थामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
-सुधाकर बारेकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष