अखेर धान केंद्राचा शुभारंभ
By Admin | Published: November 7, 2016 12:44 AM2016-11-07T00:44:38+5:302016-11-07T00:44:38+5:30
येथे हमी भाव - धान खरेदी केंद्राचा शुभारंभ विविध सेवा सहकारी संस्थेच्या वतीने करण्यात आला.
१६ गावांचा सहभाग : गोदाम मालकाची संमती
पालांदूर : येथे हमी भाव - धान खरेदी केंद्राचा शुभारंभ विविध सेवा सहकारी संस्थेच्या वतीने करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय कापसे, गोदाम मालक मुरलीधर कापसे, संचालक नत्थूजी खंडाईत, दयाराम हटवार, शालीक खंडाईत, किसन बडोले, कोठीराम भुसारी, शेतकरी वसंता हटवार आदी उपस्थित होते. यावेळी खरेदी पारदर्शक होण्याकरिता माहिती देण्याकरिता व प्रत्यक्ष लक्ष ठेवण्याकरिता जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे प्रतिनिधी बी.टी. पांडे, कृ.उ. बाजार समितीचे मनोहर झलके, किशोर भैसारे यांनी शेतकऱ्यांना व खरेदी केंद्रातील कर्मचाऱ्यांना, हमालांना सविस्तर माहिती दिली. अध्यक्षांनी एका एकरात १२ क्विंटल म्हणजे ८ खंडी धान खरेदी करण्याचे आदेश असल्याचे सांगितले. खरेदी केंद्रावर भ्रष्टाचाराला शेतकऱ्यांनी प्रतिसाद टाकावा असे आवाहन केले.
संचालक नत्थूजी खंडाईत यांनी शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाची माहिती आम्हाला झाली आहे. दररोज सुमारे १५०० रुपयापर्यंत खरेदीचा मानस असून फारच कमी कालावधीत पेमेंटची सोय करण्यात येईल. तसेच १४७० रु. दराने ब दर्जात धान खरेदी करण्यात येईल. अ दर्जाबाबद जिल्हा मार्केटिंग अधिाकरी हनमंत पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेता येईल. संचालक दयाराम हटवार यांनी हमालीचा प्रश्न उचलत प्रती कट्टा ३ रुपये अधिक होत असून शासनही प्रति क्विंटल ७ रु. देतो आहे. तेव्हा शेतकऱ्यांचा विचार करावा असे विचार ठेवले.
धान खरेदी केंद्रावर गर्दी होऊ नये, सुरळीत खरेदीकरिता लाखनी तालुक्यात हमी धान खरेदी केंद्रांना गाव वाटून दिले आहेत. पालांदूर धान खरेदी केंद्राअंतर्गत खराशी, खुनारी, लोहारा, नरव्हा, पाथरी, मरेगाव, वाकल, ढिवरखेडा, मेंगापूर, कवलेवाडा, निमगाव, पालांदूर, घोडेझरी, कवडसी, गोंदी अशी १६ गावांची धुरा ठेवली आहे. संस्थेच्या कोठाराची क्षमता ३५०० क्विंटल असून इतर दोन मोठी कोठारे भाडे तत्वाने मुरलीधर कापसे यांच्या मालकीचे घेतले आहेत. शेतकऱ्यांना कोठाराअभावाने होणारा त्रास टाळण्याकरिता शासनाकडे १४ लक्ष रु. २०११ पासून थकीत असूनही आज कोठार दिल्याने धान खरेदी पालांदुरात शक्य झाली. शेतकऱ्यांनी त्याचे उद्घाटनाप्रसंगी अभिनंदन केले. शासनानेही थकीत रक्कम त्वरीत देत धान खरेदी नियमित, पारदर्शकता व्हावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गानी व्यक्त केली. धान खरेदी वेळी सातबारा, आधारकार्ड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खाता क्रमांक असणे अनिवार्य असल्याचे संस्थेचे सचिव सुनिल कापसे यांनी सांगितले. धानाचा ओलावा, वजन याविषयी माहिती देत धान खरेदी केंद्राचा अधिकृतरित्या ११ दिवसाच्या विलंबनाने शुभारंभ करण्यात आला. (वार्ताहर)