अखेर कामांच्या चौकशीचे आदेश धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:32 PM2017-11-12T23:32:02+5:302017-11-12T23:32:18+5:30
तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाने केलेल्या कामासंदर्भात बोगस बिले तयार केले आहेत.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाने केलेल्या कामासंदर्भात बोगस बिले तयार केले आहेत. यात वृक्ष लागवड, रोपवाटीका तथा डोंगरला येथील उद्यानातील कामांचा समावेश आहे. या प्रकरणाची गंभीर दखल महाराष्ट्र शासनाचे अवर सचिवांनी घेतली असून त्यांची सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांना चौकशी करून संबंधितावर कायदेशिर कारवाईचे आदेश दिले आहे. या आदेशाने सामाजिक वनीकरण विभागात एकच खळबळ माजली आहे.
एकच लक्ष्य दहा कोटी वृक्ष महत्वाकांक्षी उपक्रम राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राबवित आहेत. लाखोंचा निधी येथे शासनाकडून दिला जात आहे. सामाजिक वनीकरण विभागाने रस्त्याच्या बाजुला वृक्ष लागवड केली. वृक्ष लागवड कामांची माहिती फलकावर लिहिली, परंतु कामांची किंमत लिहिली नाही. प्रकरण तापल्यावर फलकावर किंमती नमूद करण्यात आल्या. वृक्ष लागवडीनंतर त्यासाठी लागणारे खत, किटकनाशक औषधे खरेदी करण्यात आली. ती बिले सुद्धा बोगस असल्याचे समजते. तुमसर, खापा व पचारा येथील विविध साहित्य व औषधे खरेदींची बिले घेण्यात आली.
डोंगरला येथे स्व. उत्तमराव पाटील उद्यान तयार करण्यात येत आहे. हे उद्यान २४ हेक्टर मुरूमी जागेवर तयार करण्यात आले. प्रवेशद्वारापासून दोन्ही बाजूला रस्त्याला लागून मोठी नाली तयार करण्यात आली. खोदलेल्या नालीतील मुरूम रस्त्यावर घालण्यात आले. सागवान वृक्षांची येथे जूनीच लागवड केली आहे. येथे नोव्हेंबर महिन्यात झाडे लावण्यात आली. जून ते आॅगस्ट महिन्यात वृक्ष लागवडींचा नियम आहे. खेळांचे साहित्य भंगारात जाण्याची येथे वेळ आली आहे. उद्यान केवळ नावापुरतेच येथे दिसत आहे.
रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे शेवटची घटका मोजत आहेत. मजूरांच्या नावातही येथे घोळ असल्याची दाट शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्ते कमलाकर निखाडे यांनी ‘आपले सरकार पोर्टल’वर तक्रार केली होती. याबाबत अवर सचिव विजय खेडेकर यांनी दखल घेत कारवाईचे निर्देश दिले.
विभागावर जिल्हास्तरावर सामाजिक वनीकरण विभागाचे उपवनसंरक्षक अधिकारी आहेत. त्यांचे तालुकास्तरीय विभागावर नियंत्रण व देखरेख असते. येथे नियंत्रण व देखरेख नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सामाजिक वनीकरणाचे वनपरिक्षेत्राधिकारी एफ.एम. राठोड, उपवनसंरक्षक योगेश वाघाये तथा अन्य ग्रामस्थांसोबत एका आठवड्यापूर्वी आ. चरण वाघमारे यांनी डोंगरला येथे प्रत्यक्ष कामांची पाहणी व चौकशी केली. चौकशीत तांत्रिक त्रुट्या आ. चरण वाघमारे यांना आढळल्या होत्या. या प्रकरणाची चौकशी करून लक्षवेधी अधिवेशनात मांडणार असल्याचे आ. वाघमारे यांनी सांगितले.