अखेर पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:42 AM2021-09-07T04:42:24+5:302021-09-07T04:42:24+5:30
थकीत वीज बिलामुळे जिल्ह्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची वीज खंडित करण्यात आली होती. सणासुदीच्या दिवसात वीज खंडित केल्याने रोष निर्माण ...
थकीत वीज बिलामुळे जिल्ह्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची वीज खंडित करण्यात आली होती. सणासुदीच्या दिवसात वीज खंडित केल्याने रोष निर्माण झाला होता. थकीत वीजबिल भरायचे कुणी, हा तिढा कायम होता. सरपंच संघटना बिल भरण्यास तयार नव्हते, तर महावितरण बिल भरल्याशिवाय जोडणी करणार नाही, असे सांगत होते. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती.
लाखनी व साकोली तालुका सरपंच संघटनेने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना घेराव घालून वीज समस्या सोडविण्यासाठी ठिय्या आंदोलन केले. वीज वितरणचे अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्याशी चर्चा केली. जिल्हा परिषदेमार्फत वीजबिल भरण्याचे सुचविले. जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरणला बिल भरण्याचा शब्द दिला. त्यावरून पथदिव्यांची वीज सोमवारी दुपारीच सुरळीत करण्यात आली. पोळ्याच्या पर्वात खंडित वीज सुरळीत झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला. पालांदूर परिसरातील ३१ गावांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती पालांदूर महावितरणचे साहाय्यक अभियंता मयंक सिंग यांनी सांगितले.
कोट
जिल्हाधिकाऱ्यांनी थकीत वीज बिलाची रक्कम भरण्याचा शब्द दिला. त्यामुळे खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. येत्या दोन ते तीन दिवसांत वीजबिलाची रक्कम भरणा न झाल्यास पुन्हा वीज खंडित केली जाईल.
-स्मिता पारखी,
कार्यकारी अभियंता, महावितरण, साकोली