अखेर गणेशपूर कोरंभी रस्त्याची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:31 AM2021-02-15T04:31:07+5:302021-02-15T04:31:07+5:30
भंडारा : तालुक्यातील गणेशपूर पिंडकेपार ते कोरंभी या मार्गाचे विस्तारीकरणांतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात आले होते. मात्र, हा रस्ता ...
भंडारा : तालुक्यातील गणेशपूर पिंडकेपार ते कोरंभी या मार्गाचे विस्तारीकरणांतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात आले होते. मात्र, हा रस्ता या बांधकामात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याने, रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. या संदर्भात आदर्श युवा मंचने संबंधित विभागाला निवेदन देत कारवाईची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत, सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या डागडुजीला प्रारंभ केला असून, नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
माहितीनुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गणेशपूर कोरंबी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. सदर योजनेंतर्गत निधीची रक्कम जवळपास २५९.११ लक्ष इतकी होती. या बांधकामात त्यावेळी अभियंता ते कंत्राटदार यांच्या संगनमताने बांधकाम साहित्यात मोठा घोळ करण्यात आल्याचा आरोप गणेशपूर येथील आदर्श युवा मंचने निवेदनातून केला होता. सिमेंटमध्ये राखेचे आणि रेतीचा डस्टचा वापर करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला होता. त्यामुळे अल्पावधीतच या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. परिणामी, दोषींवर कारवाई करावी कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत घालावे, कामाचे नवीन निविदा काढावी, अशी मागणी ही आदर्श युवा मंचने रेटून धरली होती. त्यावेळी अभियंता वैरागकर यांना निवेदन देण्यात आले होते.
या निवेदनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली असून, संबंधितांकडून योग्य चौकशी व कंत्राटदार यांच्याशी चर्चा करून ८५ मीटर रस्ता पुन्हा ठेकेदाराकडून नविनीकरण करून घेतला आहे. विशेष म्हणजे, याची दुरुस्ती कंत्राटदाराच्या मोबदल्यातूनच करण्यात आल्याचे समजते. यात इतर कोणाचाही हस्तक्षेप नसल्याचे पत्रही आदर्श युवा मंचचे पवन मस्के यांना प्राप्त झाले आहे. सदर रस्त्याच्या बांधकामांमुळे या मार्गावरील शेकडो ग्रामस्थांना आता प्रवास करताना कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. डागडुजीच्या प्रसंगी यावेळी आदर्श युवा मंचचे अध्यक्ष पवन मस्के, लुकेश जोध, संजू मते, मोनू बांते, मोनार्च शेंडे, पारस वैद्य, आयुष भोंडे, चेतन जोध, मयूर कुथे, मोहित मडामे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.