अखेर गोंडसावरी येथे धान खरेदी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:31 AM2021-03-22T04:31:49+5:302021-03-22T04:31:49+5:30
मार्च महिना उजाडूनही खरीप हंगामातील धानाची उचल करण्यात न आल्याने गोंडसावरीतील शेतकरी अडचणीत सापडले होते. कष्टाने पिकवलेल्या धानाची विक्री ...
मार्च महिना उजाडूनही खरीप हंगामातील धानाची उचल करण्यात न आल्याने गोंडसावरीतील शेतकरी अडचणीत सापडले होते. कष्टाने पिकवलेल्या धानाची विक्री झाल्यावर दोन पैसे खिशात येतील, या आशेवर दिवस काढत होते. मात्र तालुका खरेदी-विक्री संघाने साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून धान मोजणीस असमर्थता दाखवली होती. यामुळे तब्बल साडेतीन हजार पोती धानाचा प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येला वेळीच वाचा फोडत ‘लोकमत’मध्ये वृत प्रकाशित केले होते. यावरून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश काढले. त्यानुसार खरेदी-विक्री संघाने कार्यवाही पार पाडून शनिवारपासून प्रत्यक्ष धान खरेदी सुरू केली.
चुकारे लवकर वर्ग करावे
धान मोजणी करण्यात आधीच उशीर झाला आहे. पीककर्ज भरण्याची ३१ मार्च शेवटची तारीख आहे. यासाठी अवघा एक आठवडा शिल्लक राहिल्याने चुकारे त्यापूर्वी खात्यावर वर्ग करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.