अखेर भाजप फुटीर गटाला अर्थ व बांधकाम सभापती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 05:00 AM2022-06-01T05:00:00+5:302022-06-01T05:00:20+5:30
भंडारा जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. यावेळी सभापतींचे खातेवाटप आणि १० समित्यांवर सदस्यांची निवड करण्यात आली. बांधकाम सभापतीपद कुणाला मिळणार याची उत्सुकता होती. काँग्रेसचे रमेश पारधी बांधकाम सभापती पद मिळावे यासाठी प्रयत्नशील होते. मात्र सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला मदत करणाऱ्या भाजपच्या फुटीर गटाने बांधकाम सभापती पद प्रतिष्ठेचे केले होते. अखेर मंगळवारच्या सभेत त्यांनी हे पद आपल्या पदरात पाडून घेतले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेनंतर सभापती पदावरुन सुरु असलेल्या चढाओढीत अखेर भाजप फुटीर गट सरशी ठरला. महत्वाचे अर्थ व बांधकाम सभापतीपद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संदीप ताले यांना देण्यात आले. तर अपक्ष राजेश सेलोकर यांना कृषी व पशुसंवर्धन तर काँग्रेसचे रमेश पारधी यांना शिक्षण व आरोग्य विभाग देण्यात आला. काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या फुटीर गटासोबत केलेली हातमिळवणी आता काँग्रेसलाच जड जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
भंडारा जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. यावेळी सभापतींचे खातेवाटप आणि १० समित्यांवर सदस्यांची निवड करण्यात आली. बांधकाम सभापतीपद कुणाला मिळणार याची उत्सुकता होती. काँग्रेसचे रमेश पारधी बांधकाम सभापती पद मिळावे यासाठी प्रयत्नशील होते. मात्र सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला मदत करणाऱ्या भाजपच्या फुटीर गटाने बांधकाम सभापती पद प्रतिष्ठेचे केले होते. अखेर मंगळवारच्या सभेत त्यांनी हे पद आपल्या पदरात पाडून घेतले. भाजपच्या फुटीर गटासोबत असलेले अपक्ष राजेश सेलोकर यांना कृषी व पशुसंवर्धन तर काँग्रेसचे रमेश पारधी यांना शिक्षण व आरोग्य विभाग देण्यात आला.
जिल्हा परिषद अध्यक्षांकडे स्थायी व जलसंवर्धन विभाग राहणार आहे. यापूर्वी समाज कल्याण सभापतीपदी मदन रामटेके तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी स्वाती वाघाये यांची निवड करण्यात आली होती.
समिती निवडीवरुन सदस्य आक्रमक
- दहा विषय समित्यांच्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. मात्र निवडीचे अधिकार कुणाला आहेत यावरुन सभेत चांगलीच खडाजंगी झाली. समिती वाटपाचे अधिकार अध्यक्षांना असल्याचे सांगण्यात आले. त्यावर राष्ट्रवादीचे यशवंत सोनकुसरे आणि भाजप गटनेते विनोद बांते यांनी असे अधिकार अध्यक्षांना नसुन सभागृहाला असल्याचे सांगितले. अध्यक्षांनी विषयाची मांडणी करावी. सभा त्याला अनुमोदन देईल असे सांगितले. ही मागणी अध्यक्षांनी मान्य केली आणि समितीवरील सदस्यांची निवड पार पडली.
सभेला एक तास विलंब
- जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी दुपारी १ वाजता आयोजित होती. मात्र ही सभा तब्बल एक तासाने म्हणजे २ वाजता सुरु झाली. यावेळी सदस्य प्रियंक बोरकर यांनी नाराजी व्यक्त करीत अध्यक्ष शिक्षक आहेत. ते शिस्तप्रिय आहेत. त्यामुळे सभा उशिरा होणे योग्य नसल्याचे म्हटले. त्यावर अध्यक्षांनी ही सभा पुढल्या वेळी नियोजित वेळीच होईल असे सांगितले.