अभियंता तेजराम राखडे यांचा मृतदेह नाल्यात आढळला, मृत्यूचं गूढ कायमच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 02:49 PM2023-07-08T14:49:32+5:302023-07-08T14:52:40+5:30
अभियंता असलेले ५७ वर्षीय तेजराम राखडे ५ जुलैच्या सायंकाळी ६ वाजता गोसीखुर्द उजवा कालव्याच्या बाजूला बाजूने फिरायला गेले होते. मात्र ते रात्री घरी परतले नाही.
पवनी (भंडारा) : अभियंता तेजराम किसन राखडे यांच्या रहस्यमयरीत्या बेपत्ता होण्याच्या घटनेनंतर ३६ तासांनी त्यांचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले. कालव्याच्या काठावर कपडे, दुचाकी ठेवलेल्या राखडे यांचा मृतदेह कालव्यापासून काही अंतरावरील नाल्यालगतच्या झाडाला अडकलेला शुक्रवारी आढळला.
खासगी अभियंता असलेले ५७ वर्षीय तेजराम राखडे बुधवारी ५ जुलैच्या सायंकाळी ६ वाजता गोसीखुर्द उजवा कालव्याच्या बाजूला बाजूने फिरायला गेले होते. मात्र ते रात्री घरी परतले नाही. दुसऱ्या दिवशी शोध घेतला असता कालव्याच्या बाजूला त्यांची स्कुटी, अंगातील कपडे, मोबाइल व पाणी बॉटल व्यवस्थित ठेवलेले आढळून आले. त्यामुळे कालव्यात बुडून पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले असावे किंवा अभयारण्यातील वन्य प्राण्यांनी हल्ला केला असावा, अशी शंका घेतली जात होती.
कालव्यावर फिरायला गेले, अन् अभियंता बेपत्ता झाले!
दरम्यान, कालव्याचे सोडलेले पाणी कमी करून गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न करूनही यश आले नाही. शुक्रवारीही शोधमोहीम सुरू होती. या दरम्यान, दुपारी १ वाजता घटनास्थळापासून उजवीकडे वाहणाऱ्या उपास्या नाल्यात एक किलोमीटर अंतरावर आडव्या पडलेल्या झाडाला अडकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
कोदूर्ली येथील युवकांनी नाल्यातून चालत जाऊन त्यांचा मृतदेह शोधून काढला. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण हारगुडे यांनी त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांसह पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. सायंकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत.
गूढ कायमच
तेजराम राखडे पट्टीचे पोहणारे होते. तरीही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून त्यांचा मृत्यू होण्याचे गूढ कायमच आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.