अखेर महायुतीचे उमेदवार ठरले; भंडाऱ्यात भोडेकर, तुमसरात कारेमोरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 01:09 PM2024-10-24T13:09:15+5:302024-10-24T13:10:05+5:30
महायुतीकडून साकोलीची घोषणा नाही : महाआघाडीत घोषणेची प्रतिक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अखेर भंडारा आणि तुमसर विधानसभा मतदार संघात महायुतीने उमेदवारांची घोषणा केली आहे. भंडारा विधानसभेसाठी शिवसेना (शिंदे गट) उमेदवार म्हणून आमदार नरेंद्र भोंडेकर आणि तुमसर विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भंडारा विधानसभा क्षेत्रात महायुतीमध्ये उमेदवारीवरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये उमेदवारीवरून बरीच स्पर्धा सुरू होती. तिकीटाच्या लढाईत भोंडेकर यांनी बाजी मारली. मंगळवारी रात्री उशिरा पक्षाकडून जाहीर झालेल्या यादीमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला.
तुमसरमध्ये गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार यांनी घेतलेल्या मेळाव्यातून राजू कारेमोरे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. एवढेच नाही तर, कामाला लागण्याचे स्पष्ट आदेशही भाषणातून दिले होते आता उमेदवारी जाहीर झाल्याने या दोन्ही मतदारसंघातील वाद थांबला आहे.
महाआघाडीत तिकीटावरून प्रचंड वाद ?
महाआघाडीमध्ये जिल्ह्यातील एकाही मतदार संघात उमेदवारी जाहीर झालेली नाही. भंडाऱ्यामध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात तिकीटासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसकडून पुढे आलेल्या नावाला प्रत्यक्ष घरातूनच प्रचंड विरोध सुरु झाला आहे. तुमसर क्षेत्रातही अशीच स्थिती आहे. संभाव्य उमेदवार असलेले चरण वाघमारे यांच्याविरोधात महाआघाडीतील स्थानिक नेत्यांनीच जोरदार आघाडी उघडली आहे. साकोलीचे तिकीट नाना पटोले यांच्यासाठी पक्के मानले जात असले तरी घोषणा बाकी आहे.
आता प्रतिक्षा साकोलीची
महायुतीने दोन जागी उमेदवार जाहीर केले असले तरी आता साकोलीची घोषणा बाकी आहे. या मतदार संघात भाजपऐवजी राष्ट्रवादीला तिकीट देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याविरोधात स्थानिक भाजप नेत्यांनी जोरदार आघाडी उघडली आहे. हा वाद आता वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहचल्याने येथील उमेदवारीची घोषणा लांबणीवर पडल्याची माहिती आहे