अखेर ‘त्या’ चार तरूणांना अटक
By admin | Published: March 13, 2017 12:24 AM2017-03-13T00:24:31+5:302017-03-13T00:24:31+5:30
एका गरीब कुटुंबातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष देऊन तिला जंगलात नेले. तिथे तिच्यावर या पाच तरूणांनी सामूहिक अत्याचार केला.
प्रकरण लाखांदुरातील सामूहिक अत्याचाराचे : एक आरोपी फरार
भंडारा : एका गरीब कुटुंबातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष देऊन तिला जंगलात नेले. तिथे तिच्यावर या पाच तरूणांनी सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर या तरूणांनी चित्रीकरण करून ती चित्रफित व्हायरल केली. या माहितीचे पुरावे हाती लागताच रविवारला ‘लोकमत’मध्ये हे वृत्त प्रकाशित होताच जिल्ह्यात खळबळ उडाली. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आरोपींचा सुगावा घेऊन चार तरूणांना अटक केली असून एका फरार आरोपींच्या मागावर लाखांदूर पोलीस आहे.
इसरार अहमद खाँ पठाण, सलीम अहमद खाँ पठाण, चेतन सुरेश निनावे, सागर रमेश हुकरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सौरभ उपरे हा फरार झाला आहे. हे सर्व आरोपी लाखांदूर येथील रहिवासी आहेत. ही घटना २५ फेब्रुवारीला लाखांदूरजवळील पिंपळगांव जंगलात घडली. सामूहिक अत्याचारादरम्यान आरोपी तरूणांनी अत्याचाराची मोबाईलवर चित्रफित तयार केली व ती व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित केली. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची माहिती लाखांदुरात अनेकांना झाली. मात्र, याबाबत वाच्यता करण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. सोबतच पोलीसही तक्रार दाखल होण्याची वाट पाहत होते. दरम्यान ‘लोकमत’ने ‘१६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार’या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. या वृत्तामुळे पोलीस प्रशासनाने आरोपी तरुणांच्या अटकेसाठी सूत्रे हालविली. प्रभारी ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यांनी पीडित मुलीची रविवारला सकाळी तक्रार दाखल करून घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी इसरार पठाण, सलीम पठाण, चेतन निनावे, सागर हुकरे, सौरभ उपरे या पाच जणांविरूध्द भादंवि ३७६ (ड), ३६२, ५०६ (ब) सहकलम ४ व ६ बाल लौंगिक अत्याचार सरंक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. यानंतर इसरार पठाण, सलीम पठाण, चेतन निनावे, सागर हुकरे या चौघांनाही अटक केली. अटकेच्या भीतीमुळे सौरभ उपरे हा आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे हे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
लोकमतच्या वृत्ताने मिळाले पीडितेला बळ
अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची चित्रफित सोशल मिडियावर व्हॉयरल केली. यामुळे पीडित मुलगी भयभीत झाली होती. तिने पोलिसात तक्रार दाखल करू नये, यासाठी आरोपींकडून दबाव आणण्यात आला होता. ही चित्रफित लाखांदुरातील अनेकांच्या मोबाईलवर झळकली. मात्र, याबाबत कुणीही तक्रार करण्यासाठी धजावले नाही. उलट काहींनी ही चित्रफित अनेकांना व्हायरल केली. ही चित्रफित शनिवारी रात्री ‘लोकमत’च्या हाती लागताच वृत्त प्रकाशित केले. यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे पीडिताला बळ मिळाल्याने तिने आज पोलीस ठाण्यात स्वत: जावून आरोपिंविरूध्द तक्रार दाखल केली. ‘लोकमत’ने सामाजिक बांधिलकीतून घेतलेल्या या पुढाकारामुळे आरोपींना अटक झाली असून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल अनेकांनी ‘लोकमत’चे आभार मानले.
एक आरोपी पोलीस अधिकाऱ्याचा भाचा
या सामूहिक अत्याचारातील एक आरोपी असलेला सागर रमेश हुकरे हा एका पोलीस निरीक्षकाचा भाचा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासात दबाव येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपास करावा, अशी जिल्हावासीयांची अपेक्षा आहे.
पीडित मुलीच्या तक्रारीवरून या प्रकरणातील सौरभ उपरे हा आरोपी फरार झाला आहे. तो चंद्रपूर जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली असून त्याच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना केले आहे.
- सुरेश ढोबळे,सहायक पोलीस निरीक्षक, लाखांदूर.