अखेर सिहोऱ्यात राज्य मार्गावर गतिरोधक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:06 AM2021-02-18T05:06:22+5:302021-02-18T05:06:22+5:30
तुमसर - बपेरा राज्य मार्गावर नाकाडोंगरी मार्गावरील वाहतूक वळती करण्यात आल्यानंतर वाहनांच्या वर्दळीत वाढ झाली आहे. याशिवाय राज्य मार्ग ...
तुमसर - बपेरा राज्य मार्गावर नाकाडोंगरी मार्गावरील वाहतूक वळती करण्यात आल्यानंतर वाहनांच्या वर्दळीत वाढ झाली आहे. याशिवाय राज्य मार्ग अरुंद असल्याने वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे. असे असले तरी वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. यामुळे रोज राज्य मार्गावर अपघात होत असल्याने वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने राज्य मार्गावर गतिरोधक उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले होते. याशिवाय गतिरोधकांसाठी नागरिकांनी ओरड सुरू केली होती. दरम्यान, राज्य मार्गावरील सिहोरा गावात ग्रामीण सचिवालयाजवळ गतिरोधक उभारण्यात आले आहे. गतिरोधक करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने कंजुषी केल्याचे आरोप गावकरी करीत आहेत. टी पॉइंटवर दोन्ही बाजूने गतिरोधक निर्माण करण्यात आले नाहीत. या शिवाय बँक ऑफ इंडिया चौकातही गतिरोधक निर्माण करण्याचे टाळण्यात आले आहे. दरम्यान, चुल्हाड, हरदोली, मोहगाव खंदान, सिंदपुरी, बपेरा, देवसरा, बिनाखी गावांचे बस स्थानक परिसरात गतिरोधक तयार करण्यात आले नाही. यामुळे भरधाव वेगाने वाहने धावत आहेत. याच बसस्थानक परिसरात अधिक अपघात झाले आहेत. गोंदेखारी बसस्थानकाशेजारी बँक असल्याने वाहनांचे गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक निर्माण करण्याची ओरड ग्राहक करीत आहेत; परंतु कुणी ऐकायला तयार नाही. संपूर्ण राज्य मार्ग अपघातग्रस्त झालेला असताना नूतनीकरणासाठी प्रयत्न केले जात नाहीत. अधूनमधून राज्य मार्ग दुरुस्तीच्या चर्चा रंगल्या आहेत; परंतु या कामास बळ मिळाले नाही. कधी निधी नसल्याचे सांगण्यात आले, तर कधी निविदा निघाल्याचे माहिती देण्यात आली आहे; परंतु भूमिपूजनाचे नावावर टिकास धावली नाही. एरवी श्रेयाचे राजकारण होत असताना लोकप्रतिनिधी मात्र शांत असल्याने राज्य मार्ग नूतनीकरणावरून शंका येत आहे. अरुंद असणाऱ्या राज्य मार्गाचे रुंदीकरण झाले पाहिजे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
गावांतील रस्तेही भकास
कोरोना काळात राज्याची तिजोरी रिकामी झाल्याने अनेक रस्त्यांची दुरुस्ती व बांधकाम लांबणीवर गेले आहे. ग्रामीण भागातील रस्ते निधीअभावी भकास झाले आहेत. ग्रामीण रस्ते खड्ड्यांत गेले आहेत. बिनाखी ते गोंडीटोला मार्ग अशाच प्रकाराला बळी पडला आहे. मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत या मार्गाचे भूमिपूजन झाले; परंतु नंतर साधी गिट्टी आली नाही. रस्त्याचे डांबरीकरण लांबणीवर गेला असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला निधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. माडगी ते बपेरा गावापर्यंत जोडणाऱ्या रस्त्याची वाईट अवस्था झाली आहे.