अखेर ‘त्या’ महिलेला गमवावा लागला हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2017 12:26 AM2017-06-07T00:26:55+5:302017-06-07T00:26:55+5:30
खंडीत वीज पुरवठा सुरळी तकरण्याकरिता विजेच्या खांबावर चढलेल्या महिला वीज कर्मचाऱ्याला जिवंत विद्युत प्रवाहाचा स्पर्श झाला.
भंडारा दक्षिण क्षेत्रातील घटना : कर्तव्यावर असताना विजेच्या खांबावर शॉकमुळे भाजली
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खंडीत वीज पुरवठा सुरळी तकरण्याकरिता विजेच्या खांबावर चढलेल्या महिला वीज कर्मचाऱ्याला जिवंत विद्युत प्रवाहाचा स्पर्श झाला. यात तिचे दोन्ही हात भाजल्याने नागपूर येथे उपचार सुरु आहे. दरम्यान हात निकामी झाल्याने उजवा हात कापावा लागल्याचा दुर्देवी प्रसंगी वीज कर्मचाऱ्यावर ओढावल आहे. सदर गंभीर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न वीज वितरण अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
२९ मे च्या सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हा सत्र न्यायालयासमोर असलेल्या एका विद्युत जनित्रावर बिघाड आला. विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने तो पूर्ववत करण्याकरिता भंडारा वीज वितरण कंपनीच्या दक्षिण क्षेत्रातील सहाय्यक वीज कर्मचारी कृष्णा जिभे व अजय कुंदभरे यांच्यासह संध्या खोब्रागडे ही महिला कर्मचारी घटनास्थळावर पोहचली. यावेळी जिभे आणि कुंदभरे यांनी संध्याला खंडीत वीजपुरवठा दुरुस्त करण्याकरिता खांबावर चढविले. यावेळी तिथून वाहत असलेल्या ११ केव्ही जिवंत विद्युत तारांना तिचा स्पर्श झाला. यात ती तारांना चिपकली. त्यामुळे सहकारी दोन्ही कर्मचाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने तिथे असलेल्या प्रकाश अटाळकर यांच्यासह अन्य नागरिकांनी बांबूच्या सहाय्याने तिला तारांपासून दूर केले व तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिला नागपूर येथील शुअरटेक रुग्णालयात दाखल केले.
उपचारादरम्यान तेथील वैद्यकीय चमूने संध्याच्या दोन्ही हातापैकी उजवा हात निकामी झाल्याने शनिवारला तो कापल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या गंभीर घटनेची तातडीने दखल घेऊन सहकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही पाठबळ दिले आहे. त्यांच्यावर कारवाई न करता प्रकरणाची गुंतागुंत वाढवून महिला कर्मचाऱ्याला दोषी दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालविला असल्याची चर्चा वीज कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे.