महिला बचतगटांना २० कोटींचे अर्थसहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:09 AM2017-11-04T00:09:42+5:302017-11-04T00:10:02+5:30
ग्रामीण भागातील महिला उद्योग व्यवसायात स्वत:च्या पायावर उभे राहता यावे व कुटुंबाची आर्थिक उन्नती साधता यावी,....
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रामीण भागातील महिला उद्योग व्यवसायात स्वत:च्या पायावर उभे राहता यावे व कुटुंबाची आर्थिक उन्नती साधता यावी, यासाठी शासनाने मागील तीन वर्षात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिला बचत गटांना २० कोटी ५५ लाख रूपयांचा कर्ज पुरवठा केला आहे. या कर्जाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी लघु उद्योग करून आर्थिक उन्नती साधली आहे. या कर्जाचा ग्रामीण भागातील १९ हजार ७२३ महिलांना लाभ झाला आहे.
ग्रामीण भागातील महिलांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तेजस्विनी महिला ग्रामीण सक्षमीकरण हा कार्यक्रम राबवित आहे. त्या अंतर्गत महिला बचत गटांना अत्यल्प व्याज दरात कर्ज पुरवठा केला जातो. या कर्जातून महिला उद्योग व्यवसाय उभारतात आणि कर्ज परतफेड करतात. याच कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यातील माहिला बचत गटांना मागील तीन वर्षात शासनाने २० कोटी ५५ लाख १३ हजार ४३७ रूपयांचा कर्ज पुरवठा केला आहे.
भंडारा जिल्ह्यात एकूण २३ हजार ७० महिला बचत गट आहेत. यात मागील तीन वर्षात १,७९३ महिला बचतगटांना हे कर्ज देण्यात आले आहे. यात १,२५४ महिला शेती व्यवसाय करणाºया आहेत. या कर्जाच्या माध्यमातून महिला बचतगट आपला व्यवसाय सक्षमपणे करत आहे. माविमच्यावतीने या वर्षात जिल्ह्यातील १,५०० माहिलांना शेतीपालन प्रशिक्षण देण्यात आले. पशुसखी ही नवी संकल्पना माविमने आणली आहे.
जिल्ह्यात ३२ पशुसखी असून ग्रामीण भागातील माहिलांना या पशूसखी प्रशिक्षण देतात. पशू निगा राखणे, त्यांचे आरोग्य, खाद्य याबाबत हे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचबरोबर महिलांना कायद्याची माहिती व्हावी यादृष्टीने १७ कायदासाथी कार्यरत आहे. हे कायदासाथी महिलांमध्ये कायद्याची माहिती, महिलांचे हक्क आदीबाबत जाणीवजागृती करीत असतात.
शेती व्यवसायात असणाºया महिलांना ना नफा ना तोटा तत्त्वावर बियाणे व खत उपलब्ध करून देण्यासाठी माविमने पालांदूर व साकोली येथे कृषी सेवा केंद्र सुरु केले आहे. याचा लाभ ४२५ महिलांनी घेतला आहे. या कृषि सेवा केंद्रावर या हंगामात १० लाखांचे बियाणे व खतांची विक्री करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे जिल्ह्यात ८ पशुखाद्य विक्री केंद्र असून या केंद्रामार्फत ५१ गावात विक्री सुरु आहे. या माध्यमातून २० लाख ७८ हजाराचे पशुखाद्य विक्री करण्यात आले आहे. यातून केंद्राला २ लाख १५ हजाराचा नफा प्राप्त झाला आहे. या केंद्राला माविमतर्फे ९ लाख ७० हजाराचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाची जिल्ह्यात ८ लोकसंचालित साधना केंद्र असून ४५ सहयोगीनी आहेत. यांच्यामार्फत महिला बचत गटांना विविध मार्गदर्शन केल्या जाते. लोकसंचालित साधना केंद्राने मागीलवर्षी जिल्ह्यात ८ प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावे घेऊन माहिला बचतगटांच्या माहिलांना उद्योगासाठी प्रोत्साहित केले आहे. या सोबतच दुग्ध संकलन केंद्रही महिलाबचत गटातर्फे चालविण्यात येते. या व्यवसायात २६२ महिला सहभागी आहे. कुक्कुटपालन ३०४, भाजीपाला व्यवसाय ११८, शेळीपालन २,२१६ व इतर व्यवसायात १५० महिला सक्रीय आहेत.
महिला बचतगटांना सक्षम करण्यासाठी माविमतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केल्या जातात. सध्या विविध व्यवसायाचे ९ ठिकाणी २५३ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. महिला बचत गटांनी उद्योग व्यवसाय करतांना प्रशिक्षत असणे महत्वाचे आहे. यासाठीच त्यांना सातत्याने प्रशिक्षण दिल्या जाते. कौशल्य विकास प्रशिक्षण सुध्दा देण्यात येते. लोकसंचालित साधन केंद्रामार्फत महिला बचतगटांना वेळोवेळी मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येते. या माध्यमातून महिला स्वत: आर्थिक सक्षम होण्याच्या दृष्टीने सक्रिय होत आहेत.