रोहयो कामाअभावी मजुरांवर आर्थिक संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:44 AM2021-04-30T04:44:20+5:302021-04-30T04:44:20+5:30
रबी हंगाम संपण्याच्या मार्गावर असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील गावांतील मजूर आता रोजगार हमी योजनेच्या कामाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, पाहिजे ...
रबी हंगाम संपण्याच्या मार्गावर असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील गावांतील मजूर आता रोजगार हमी योजनेच्या कामाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाली नसल्याने मजुरांना कामाच्या शोधात इतरत्र भटकावे लागत आहे. शासन प्रशासनाच्या संबंधित विभागाने मजुरांना वर्षातून शंभर दिवस काम उपलब्ध करून द्यावे, असा शासन निर्णय आहे.
सदर निर्णयाची अंमलबजावणी करणे ही संबंधित विभागाची जबाबदारी असली तरी अजूनपर्यंत पर्याप्त प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात आली नाहीत. त्यामुळे मजूरवर्ग रोजगार हमी योजनेच्या कामाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, सदर कामे सुरू करण्यास अतिविलंब होत असल्याने कामाअभावी मजुरांवर आर्थिक संकट कोसळले आहे. पोटाची खळगी कशी भरावी, असा प्रश्न आ वासून उभा ठाकला आहे. याबाबत मजुरांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला आहे. जिल्ह्यातील पवनी, भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखांदूर, साकोली, लाखनी या तालुक्यांतील प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील प्रत्येक गाव परिसरात रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे.
निवेदनावर भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हरिदास बोरकर, अरुण ठवरे, संदीप बर्वे आदींची नावे आहेत.