कोरोनात मूर्तिकारांवर आर्थिक संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 05:00 AM2021-08-30T05:00:00+5:302021-08-30T05:00:35+5:30
मूर्तिकारांना मूर्ती बनविण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरातील सावरगाव येथून माती आणावी लागते. ही पांढरी आणि लाल माती आठ हजार रुपये चार चाकी गाडीने आणली जाते. भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथील काळी माती तीन हजार रुपये प्रति ट्रॅक्टर ट्रॉली प्रमाणे विकली जाते. या दोन्ही मातींना मिक्स करून मूर्ती बनविली जाते.
मोहन भोयर
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले असून काही दिवसात कान्होबा, गणपती, दुर्गा पूजा असे सण येणार आहेत. मात्र या मूर्तिकारांना कोरोना काळापासून उपासमारीची वेळ आली आहे. लाखोंचा व्यवसाय केवळ हजारांवर आलेला आहे.
येत्या काही दिवसांनी ग्रामीण व शहरी भागात जन्माष्टमी सण साजरा केला जातो. श्रीकृष्णाची मूर्ती घरोघरी स्थापना करून पूजा केली जाते. कोरोना काळात मूर्तिकारांनी श्रीकृष्णाची मूर्ती कमी बनविल्याने त्यांना आर्थिक नुकसान होत आहे. कोरोनापूर्वी एक मूर्तिकार ४०० ते ५०० मूर्ती तयार करीत होते. परंतु आता हा आकडा अडीचशे ते तीनशेपर्यंत गेला आहे.
प्रत्येक मूर्तीकाराचे सुमारे ५० हजाराचे आर्थिक नुकसान झाले आहे. यापुर्वी मूर्तीची उंची जास्त होती. परंतु विसर्जन घरीच करीत असल्याने मूर्तीची उंची कमी करण्यात आली आहे. काही भाविकांनी मूर्ती न मांडता फोटोची पूजा सुरू केले आहे. मूर्तीचे प्रमाण कमी झाले आहे. एका मूर्तीची किंमत १०० रुपयांपासून सुरू होत असून ती दोन ते तीन हजारपर्यंत आहे.
मूर्तिकार आधी मूर्ती बनविण्याचे काम जुलै महिन्यापासून सुरू करीत असत, कारण त्यावेळी कोरोना नसल्याने लोकांची घेतलेली ऑर्डर असलेली मूर्ती बनविली जात होती. परंतु आता फक्त एक महिन्याच्या कालावधीतच मूर्ती बनविण्याचे काम सुरू झाले. पुर्वी २५० मूर्ती बनविण्यात येत होती. आता ती १५० पर्यंत आली आहे. मागील वर्षी दीडशे मूर्ती बनवली होती त्यात केवळ ५० मूर्ती विकल्या नाही. त्यामुळे मूर्तिकारांना तीस हजाराचे नुकसान झाले.
मूर्तिकारांना मूर्ती बनविण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरातील सावरगाव येथून माती आणावी लागते. ही पांढरी आणि लाल माती आठ हजार रुपये चार चाकी गाडीने आणली जाते. भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथील काळी माती तीन हजार रुपये प्रति ट्रॅक्टर ट्रॉली प्रमाणे विकली जाते. या दोन्ही मातींना मिक्स करून मूर्ती बनविली जाते. अकरा हजार रुपये मूर्ती बनविण्याच्या आधी खर्च केल्या जातो आणि मूर्तिकार पैसे वाचवावे म्हणून घरातीलच मंडळी मूर्ती बनवून मूर्तींना आकार देऊन व मूर्तीला रंग करून त्यांना सजवून ग्राहकाला विकतात.
रोजीने काम करण्यास माणसाला ठेवले असता त्याला तीनशे रुपये रोजी द्यावी लागते. त्यामुळे ते परवडण्यासारखे नाही. याकरिता घरचीच मंडळी मूर्ती बनविण्यास हातभार लावतात.
कोरोना काळापासून सार्वजनिक गणपती दुर्गा देवी मूर्तीची उंची तीन फूट केल्याने मूर्तिकारांना नुकसान होत आहे. कोरोनाच्या पुर्वी सार्वजनिक गणपती किंवा दुर्गा देवीची मूर्ती पाच ते सात फूट असायच्या आणि त्या पाच ते दहा हजारांपर्यंत विक्री केल्या जात होत्या. परंतु आता तीन फुटाची मूर्ती तीन हजाराला विक्री केली जाते. एका मूर्तीमागे सात हजाराचे नुकसान होत आहे. लाखोंची उलाढाल आता केवळ हजारावर आली आहे.
तुमसर शहरातील शास्त्री वॉर्ड या परिसरात श्रीकृष्ण गणपती व दुर्गा देवीची मूर्ती बनविल्या जातात. आर्थिक नुकसानामुळे मूर्तिकारांनी शासनाने मदत करावी, अशी मागणी केली आहे.
एक व्यवसाय म्हणून आम्ही मूर्ती तयार करीत आहोत. आम्हाला कसलाही फायदा होत नाही. कोरोना काळापूर्वी आमचा व्यवसाय लाखोंचा व्हायचा, पण आता हजारावर आलेला आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला मदत करावी.
- संजय बोरसरे,
मूर्तिकार, शास्त्रीनगर, तुमसर