फाइन तांदळाला बाजारात मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:32 AM2021-01-13T05:32:05+5:302021-01-13T05:32:05+5:30
मुखरू बागडे पालांदूर : गत तीन ते चार वर्षांनंतर प्रथमच फाइन तांदळाला बाजारपेठेत बऱ्यापैकी मागणी दिसत आहे. सर्वसाधारण ...
मुखरू बागडे
पालांदूर : गत तीन ते चार वर्षांनंतर प्रथमच फाइन तांदळाला बाजारपेठेत बऱ्यापैकी मागणी दिसत आहे. सर्वसाधारण जातीतील फाइन तांदळाला प्रतिकिलो ४० ते ४५ रुपये किलो असा दर मिळाला आहे. यामुळे फाइन धानालासुद्धा प्रतिक्विंटल २२०० रुपयांपर्यंतचा दर व्यापाऱ्यांकडून मिळत आहे.
भंडारा जिल्ह्याला धानाचे कोठार समजले जाते. संपूर्ण भारत देशात भंडारा जिल्ह्यातील तांदूळ सुपरिचित आहे. इंग्रज काळातही दिल्लीपर्यंत भंडारा येथील तांदळाची मागणी होती. तुमसर येथील तांदळाची मोठी बाजारपेठ म्हणून महाराष्ट्रासह देशात नावाजलेली आहे. चुलबंद, वैनगंगा, सूर, बावनथळी नद्यांच्या खोऱ्यात सुपीक मातीतून येणारे तांदळाचे उत्पन्न चवदार असल्याने मागणी निश्चितच अधिक असते; परंतु गत चार-पाच वर्षांपासून शासकीय धोरणाच्या फटक्याने बारीक धानाची लागवड कमी होऊन ठोकळ धानाची लागवड सुमार केली जाते. ठोकळ धानाला आधारभूत केंद्राचा मोठा आधार लाभल्याने ठोकळ धान सर्वाधिक भावाने व कमी खर्चाने पिकविले जाते. बारीक धानाला उत्पादन खर्च अधिक होऊन व्यापाराच्या माध्यमातून जोखीम पत्करत विक्री करावी लागते. यात उत्पन्न खर्चाच्या हिशेबात कमी पैसे मिळतात.
धानावर प्रक्रिया करणारे अत्याधुनिक नवे तंत्र यापूर्वी नसल्याने शेतकरी वर्ग बारीक धान लावायला धजावत नव्हता. मात्र, हल्ली भंडारा जिल्ह्यात सुमारे दहा अत्याधुनिक भात गिरण्या उभ्या झाल्याने शेतकरी वर्गाला तांदूळनिर्मितीकरिता चांगली संधी निर्माण झाली आहे. पालांदूर येथेसुद्धा अत्याधुनिक सोयींयुक्त भारत राइस मिल उभी झाल्याने फाइन उत्पादकांना नवी संधी मिळाली आहे. त्या संधीचे सोने करीत राइस मिलर्स अर्थात भात गिरणीधारक व काही प्रगतिशील शेतकरी फाइन धानाची लागवड करीत तांदूळ थेट ग्राहकांना विक्री करतात. यामुळे शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळतात. पशुसंवर्धनाकरिता कुकुससुद्धा मिळत असल्याने शेतकरी फाइन धानाकडे उन्हाळी हंगामात वळल्याचे दिसत आहे.
बॉक्स
तांदळाच्या नवनव्या आरोग्यवर्धक जाती
बदलत्या हवामानानुसार मानवी आरोग्य रोगराईच्या सावटात सापडत चालले आहे. सर्वसाधारणतः शर्करा रोगाचे प्रमाण भारत देशात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भात न खाण्याचे सांगितले जाते; परंतु बदलत्या काळानुसार कृषी विभागाने व पंजाबराव कृषी विद्यापीठांतर्गत शेतकऱ्यांना अत्याधुनिक मार्गदर्शन केले जात आहे. काळा, लाल, चिन्नोर तांदूळ तयार करून बाजारात शेतकऱ्यांनी विक्रीला आणला आहे. ५० ते १०० रुपयांपर्यंतचा दर या तांदळाला मिळत आहे.
चौकट
ग्रामीण भागातून तांदळाची निर्यात शक्य!
शेतकऱ्यांनी सलग फाइन धानाच्या जाती समूहाने लावाव्यात. त्यामुळे व्यापारी दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या धानाला मागणी अधिक असेल. भविष्यात पालांदूर इथूनसुद्धा विदेशात फाइन तांदळाची थेट निर्यात नियोजित आहे. दक्षिण आफ्रिकेत काही देशांत पालांदूर येथील तांदळाचे सॅम्पल गेलेले आहे. त्याला पसंती मिळताच निर्यातीचे धोरण ठरविण्यात येईल. यामुळे निश्चितच पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांना फाइन धानाकडे वळण्याची नामी संधी उपलब्ध होऊ शकते.
कोट बॉक्स
बारीक तांदळाला मागणी वाढली आहे. तुडतुडा, पूर समस्या आदी कारणाने बारीक धानाच्या उत्पन्नात घट आली. पुरवठा कमी व मागणी कायम आहे. सुमारे ५० टक्क्यांच्या वर कुटुंबे फाइन तांदळाला मागणी करीत आहेत. शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागातही बारीक तांदळाला मागणी वाढलेली आहे. भारत भात गिरणीत तांदळाचा दर्जा उत्तम पद्धतीने तयार होत आहे. शेतकऱ्यांचा तांदूळ ग्राहकांच्या पसंतीला उतरल्याने स्थानिक ठिकाणीसुद्धा बारीक तांदळाला मागणी वाढलेली आहे. नागपूरसारख्या मोठ्या बाजारपेठेतसुद्धा फाइन तांदळाला मागणी आहे.
उमेर लद्धानी
तांदूळ व्यापारी, पालांदूर/मेंगापूर.