कोरोना प्रतिबंधक निर्देशाच्या उल्लंघनप्रकरणी दहा हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:36 AM2021-03-17T04:36:26+5:302021-03-17T04:36:26+5:30
: लाखांदूर येथील घटना लाखांदूर : कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने सर्वत्र मंगल कार्यालये, सभागृहात गर्दी टाळण्याचे बंधनकारक केलेले असताना ५० ...
: लाखांदूर येथील घटना
लाखांदूर : कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने सर्वत्र मंगल कार्यालये, सभागृहात गर्दी टाळण्याचे बंधनकारक केलेले असताना ५० पेक्षा अधिक वऱ्हाडींना घेऊन लग्न समारंभ आयोजित केल्याने १० हजार रुपये दंडाची कारवाई केल्याची घटना घडली. सदर कारवाई लाखांदूर येथील तहसील, पोलीस व नगरपंचायत प्रशासन आदींच्या संयुक्त पुढाकारात १६ मार्च रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान स्थानिक लाखांदूर येथील आशीर्वाद मंगल कार्यालय चालकाविरोधात करण्यात आली.
माहितीनुसार, घटनेच्या दिवशी स्थानिक लाखांदूर येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शासनाने यापूर्वीच राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांचा संभाव्य धोका लक्षात घेता सर्वत्र मंगल कार्यालय व सभागृह चालकांना ५० पेक्षा अधिक नागरिकांची गर्दी होणार नाही, यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश दिले होते. तथापि, या निर्देशांचे पालन न झाल्यास प्रारंभी दंडात्मक व दुसऱ्यांदा, तसेच आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश निर्गमित केले आहेत. त्यानुसार घटनेच्या दिवशी येथील मंगल कार्यालयात ५० पेक्षा अधिक नागरिक लग्न समारंभात आढळून आल्याने संभाव्य धोका लक्षात घेता येथील तहसील, पोलीस व नगरपंचायत प्रशासन आदींच्या संयुक्त पुढाकारात १० हजार रुपयांचा दंड करण्यात आला. यावेळी सदर मंगल कार्यालय चालकाने येथील नगर पंचायत प्रशासनाकडे दंडाच्या रकमेचा भरणादेखील केला आहे. दरम्यान, तालुक्यात कोरोना पार्श्वभूमीवर येथील तालुका प्रशासनाने केलेल्या या दंडाच्या कारवाईने कोरोना निर्देशाचे उल्लंघन करणाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचे बोलले जात आहे.
बॉक्स :
नगर पंचायत प्रशासनाचा गलथान कारभार
विवाह सोहळ्यात ५० पेक्षा अधिक नागरिक आढळून आल्याने येथील तालुका प्रशासनाने मंगल कार्यालय चालकाविरोधात १० हजार रुपये दंडाची कारवाई केली. सदर कारवाईनुसार संबंधित चालकाने दंडाचा भरणादेखील केला. मात्र, नगर पंचायत प्रशासनांतर्गत दंडाचा भरणा केल्याच्या पावतीवर १६ मार्चऐवजी १७ मार्च, अशी तारखेची नोंद करण्यात आल्याने येथील नगर पंचायत प्रशासनाच्या गलथान कारभाराची एकच चर्चा होती.