आगीत चार दुकाने जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2017 12:15 AM2017-06-20T00:15:05+5:302017-06-20T00:15:05+5:30
मध्यरात्रीच्या सुमारास इलेक्ट्रानिक व इलेक्ट्रीकल दुकानाला लागलेल्या आगीत साडे चार लाख रूपयांचे साहित्य जळून खाक झाले.
जवाहरनगर येथील घटना : साडेचार लाख रूपयांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : मध्यरात्रीच्या सुमारास इलेक्ट्रानिक व इलेक्ट्रीकल दुकानाला लागलेल्या आगीत साडे चार लाख रूपयांचे साहित्य जळून खाक झाले. स्थानिकांच्या मदतीने व अग्निशामक दलाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र प्रमोद भोंगाडे यांच्या दुकानातील साहित्याची राख झाली. दरम्यान भोंगाडे यांचा उजवा हात आगीने किरकोळ भाजला.
राष्ट्रीय महामार्गालगत ठाणा पेट्रोलपंप टी-पार्इंटलगत किशोर दंडारे यांच्या मालकीची दुकानाची चाळ आहे. यात किशोर दंडारे वस्त्रालय, दिलीप सायकल स्टोअर्स, प्रमोद इलेक्ट्रीक व इलेक्ट्रानिक, नेहा फर्निचर, बर्तन भंडार व आॅटो रिपेरिंगची दुकाने किरायाने आहेत. दैनंदिन कामे आटोपून दुकान मालक प्रमोद भोंगाडे हे ठाणा येथील घरी गेले. रविवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास भोंगाडे यांच्या इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग लागल्याचे ये-जा करणाऱ्यांना दिसले. स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रयत्न निष्फळ ठरले. दरम्यान अग्नीशामक दलाला बोलाविण्यात आले. सोमवारला सकाळी जि.प. सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, दुकान मालक प्रमोद भोंगाडे, वेणुगोपाल, किशोर दंडारे, विद्युत विभागाचे शाखा अभियंता महेश कोडवते, नत्थु गाडेगोणे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तलाठी कुमुदनी क्षीरसागर यांनी पंचनामा केला. यात फर्निचर, टिन शेड, केबल वायर, सहा टिव्ही, इलेक्ट्रीक पाईप, दहा मिक्सर, १५ टेबल, फॅन, २० सिलिंग फॅन, एलसीडी टीव्ही, दोन इन्व्हटर, तीन चार फुटाचे कुलर, २० नग मोटार पंप, पाच नग डीव्हीडीप्लेअर, १५ नग डीटीएच व इतर इलेक्ट्रीकल साहित्य असे सुमारे चार लक्ष ४४ हजार ५०० रूपये किंमतीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
रात्रीच घटना स्थळाला भेट दिली असता प्रथम विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. आज सकाळी पाहणी करण्यात आली. आग कोणत्या कारणामुळे लागली हे आताच सांगता येणार नाही. लाईनमनचा अहवाल मिळाल्यानंतर नेमके कारण सांगता येईल.
- महेश कोडवते,
शाखा अभियंता, जवाहरनगर.