शॉर्ट सर्किटमुळे लागली आग जनावरांचा गोठा जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 10:49 PM2018-05-22T22:49:35+5:302018-05-22T22:49:45+5:30
येरली साखळी शिवारात शॉर्ट सर्कीटमुळे जनावरांच्या गोठ्याला व साहित्य ठेवलेल्या जागी भीषण आग लागली. यात एका रेडयाचा जळून मृत्यू झाला तर दुसरा रेडा गंभीररित्या भाजला. तणसीचे ढिगही जळून खाक झाले. ही घटना हौसीलाल शिवलाल पटले यांच्या शेतात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : येरली साखळी शिवारात शॉर्ट सर्कीटमुळे जनावरांच्या गोठ्याला व साहित्य ठेवलेल्या जागी भीषण आग लागली. यात एका रेडयाचा जळून मृत्यू झाला तर दुसरा रेडा गंभीररित्या भाजला. तणसीचे ढिगही जळून खाक झाले. ही घटना हौसीलाल शिवलाल पटले यांच्या शेतात घडली. सुमारे ३५ हजारांचे नुकसान झाले. शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली आहे.
येरली ते साखळी दरम्यान वीज तारा आहेत. शेतकरी हौसीलाल पटले यांच्या शेतातून वीज तारा गेल्या आहेत. पटले यांनी आपल्या शेतात जनावराकरिता मांडव तयार केला. यात साहित्य ठेवले होते. जवळच चार एकरातील तणसीचा ढिग होता. अचानक शॉर्ट सर्कीटमुळे मांडवाला आग लागली. यात एक रेडा आगीत होरपळून मृत्यूमुखी पडला. दुसरा रेडा गंभीररित्या भाजला.
मांडवात नांगर, दतार, वखार, पीव्हीसी पाईप २२ नग, चारशे फुट प्लास्टीक पाईप, ५० वेळू, लाकडी बल्ल्या इत्यादी साहित्य जवळून खाक झाले. सुमारे ३५ हजारांचे आर्थिक नुकसान झाले. खरीप हंगामाच्या पूर्वी आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी पटले खचून गेले.
सदर घटनेची चौकशी करून संबंधित विभाग तथा शासनाने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पटले यांनी केली. सदर घटनेची माहिती स्थानिक ग्रामपंचायतीला देण्यात आली आहे.
शेतशिवारात मोठ्या प्रमाणात खांबावरील तारा लोंबकळत असून त्यांच्या घर्षणाने आगीची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील शेतशिवारातील अनेक वीज खांब वाकले आहेत. याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष आहे. अपघातानंतर कारवाई करणार काय असा प्रश्न उपस्थित होतो.