शार्ट सर्किटने आग, भंडारा जिल्हा परिषदेत उडाला गाेंधळ
By युवराज गोमास | Published: April 25, 2023 04:27 PM2023-04-25T16:27:17+5:302023-04-25T16:50:42+5:30
पहिल्या माळ्यावरील घटना : वेळीच स्वीच बंद केल्याने अनर्थ टळला
भंडारा :जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू असतांना अचानक पहिल्या माळ्यांवरील अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या कक्षा शेजारील व्हरांड्यात शार्ट सर्किटने आग लागली. यामुळे एकच गाेंधळ उडाला. कर्मचाऱ्यांची वेळीच मुख्य स्वीच बंद केल्याने अनुचीत प्रकार टळला. ही घटना मंगळवारला दुपारी १२:३० वाजताचे दरम्यान घडली.
सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात कुलर व पंखे सुरू झाले आहेत. भंडाराजिल्हा परिषदेतही कुलर, एसी व पंखे दिवसभर सुरू असतात. मंगळवारला कर्मचारी कामात व्यस्त असतांना पहिल्या माळयावर शार्ट शर्कीटने अचानक वायरिंगने पेट घेतला. आग व धुर दिसून येताच कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. लक्षपूर्वक पाहणी केली असता शार्ट शर्किट झाल्याचे दिसून येताच कर्मचाऱ्यांनी धाव घेत मुख्य स्वीच बंद केले. या घटनेत पहिल्या माळ्यावरील विद्युत पुरवठा खंडीत होता. पंखे व कुलर तसेच एसी बंंद पडल्याने उकाडा वाढीस लागला होता. या माळ्यावर बांधकाम विभाग, पशुसंवर्धन, जलसंधारण, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचे कार्यालय व अन्य विभागाचे कार्यालये आहेत. दोन तासांनंतर पुरवठा सुरळीत चालू आहे.
पाच वर्षापूर्वी झाले होते शार्ट सर्किट
पाच वर्षापूर्वी याच माळ्यावर असलेल्या बांधकाम विभागात शार्ट सर्किटची घटना घडली होती. त्यानंतर जिल्हा परिषद इमारतीतील जुने वायरिंग बदलविण्यात आले होते. तसेच आग नियंत्रण यंत्रण अधिक सक्षम करण्यात आली होती. परंतु या घटनेने पुन्हा विज पुरवठा व्यवस्थेचे ॲडीट करण्याची गरज निर्माण झाली आहे.