जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडाची जनमानसात धग कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:32 AM2021-01-13T05:32:53+5:302021-01-13T05:32:53+5:30
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विशेष नवजात अतिदक्षता कक्षात शनिवारी पहाटे घडलेल्या घटनेची धग अद्यापही कायम आहे. जनमानसात याच ...
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विशेष नवजात अतिदक्षता कक्षात शनिवारी पहाटे घडलेल्या घटनेची धग अद्यापही कायम आहे. जनमानसात याच घटनेची चर्चा सुरू आहे. घटनेला जबाबदार कोण आणि कारवाई कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महिलांच्या चर्चेचा हाच विषय असून त्या चिमुकल्यांप्रति हळहळ व्यक्त होत आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटे अग्नितांडव झाले. यात १० निरागस चिमुकल्यांचा बळी गेला. ही घटना समाजमन सुन्न करून गेली. तीन दिवस झाले तरी भंडारा जिल्ह्यात याच घटनेची चर्चा आहे. प्रत्येक ठिकाणी नेमकी कशी घटना घडली असेल यावरून चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही या घटनेवरून हळहळ व्यक्त करण्यासोबत संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेला दोषी असणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा झालीच पाहिजे, असे सोशल मीडियावरून सांगितले जात आहे. महिला तर या घटनेने अधिकच हळव्या झालेल्या दिसतात. सोशल मीडियासह माध्यमातील बातम्या वाचून प्रत्येकाच्या काळजात चर्र होऊन जाते. या घटनेला जबाबदार असलेल्या प्रत्येक घटकाचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. दुसरीकडे तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात मंत्र्यांचे आगमन सुरूच होते. रुग्णालयाच्या पाहणीसोबतच अग्निकांडात दगावलेल्या चिमुकल्यांच्या परिवारांच्या भेटी घेऊन सांत्वन केले जात होते. प्रशासनही त्यांच्या मागे धावताना दिसत आहे.
चिमुकल्यांच्या आठवणींनी मातांचा आक्रोश
शनिवारी पहाटे नियतीने काळजाचा तुकडा हिरावलेल्या मातांचा चिमुकल्यांच्या आठवणीने तिसऱ्या दिवशीही आक्रोश सुरू होता. मोहाडी तालुक्यातील उसर्रा येथील सुकेशिनी आगरे बाळाची आठवण काढून शोकाकुल दिसत होत्या. नातेवाईकांची घरी गर्दी वाढत आहे. प्रत्येक जण घटना कशी घडली हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. टाकला येथील दुर्गा रहांगडाले या मातेचीही अवस्था अशीच आहे. मानसिक धक्क्यातून त्या अद्यापही सावरल्या नाहीत. केवळ आपल्या चिमुकल्यांच्या आठवणींना उजाळा देत अश्रू ढाळत आहेत. मोहाडी तालुक्यातील जांब येथील प्रियंका बसेशंकर, भंडारा लगतच्या भोजापूर येथील गीता बेहरे यांच्या घरी तिसऱ्या दिवशीही बाळांच्या आठवणीने हुंदके ऐकायला येत आहेत. तीन दिवस झाले तरी कुणाच्याही डोळ्यासमोरून त्या निष्पाप बाळांचे चेहरे हलायला तयार नाहीत. येणाऱ्या-जाणाऱ्या पाहुण्यांमुळे पुन्हा-पुन्हा आठवणींना उजाळा मिळून अश्रूंना वाट मोकळी करून दिली जात आहे. नेते घरी येऊन सांत्वनेचे दोन शब्द बोलून जात आहेत. नऊही मातांच्या घरी तोच आक्रोश आजही दिसून येत आहे.