अग्निशमन यंत्रणा वाहनांअभावी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2017 12:18 AM2017-04-06T00:18:36+5:302017-04-06T00:18:36+5:30

आग आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीला धावून येणारे भंडाऱ्यातील अग्नीशामक दलच संकटात आहे.

Fire fighting machinery due to lack of vehicles | अग्निशमन यंत्रणा वाहनांअभावी संकटात

अग्निशमन यंत्रणा वाहनांअभावी संकटात

Next

पाच तालुक्यात वाहन नाही : आयुध निर्माणी, सनफ्लॅगच्या अग्निशमन वाहनावर राहावे लागते अवलंबून
इंद्रपाल कटकवार भंडारा
आग आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीला धावून येणारे भंडाऱ्यातील अग्नीशामक दलच संकटात आहे. मुबलक आणि प्रशिक्षीत कर्मचारी नसल्याने या विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण दिसून येतो. एकंदरीत भंडारा व तुमसर तालुक्यातच अग्नीशामक यंत्रणा असली तरी अन्य तालुक्यांचा भारही या विभागावर येत असल्याने संपूर्ण अग्नीशामक यंत्रणा भंडारा जिल्ह्यात कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. या विभागाला अद्ययावत आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.
तुमसर येथे नगरपालिका कार्यालयात अग्नीशामक कार्यालय आहे. ८ वर्षापूर्वी येथे वाहन खरेदी करण्यात आले. या वाहनाची जिल्ह्यात मागणी होत असते. नेहमी आग विझविण्यासाठी वाहन उपलब्ध असते. आगीच्या घटना उन्हाळ्यात अधिक प्रमाणात होत असल्याने येथील कर्मचारी नेहमी सज्ज असतात. भंडारा येथे अग्नीशामक दलासाठी स्वतंत्र कार्यालय नाही.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नीशामक दलाची भूमिका महत्वाची असते. मात्र लाखांदूर तालुक्यात कुठेही अग्नीशामन दल नसल्यामुळे लाखांदूर तालुक्यातील जनतेला अचानक लागणाऱ्या आगीपासून बचाव करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगर परिषदेच्या अग्नीशमन दलावर किंवा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी नगर परिषदेच्या अग्नीशमन दलावर अवलंबून राहावे लागते.
पवनी नगर पालिकेने २०१३ मध्ये अग्नीशामकदलाचे वाहन खरेदी केले. या वाहनासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. परंतु, अद्यापही या अग्नीशामक दलासाठी कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. परीणामी नवीकोरे वाहन शोभेची वास्तू ठरत आहे. यापुर्वी पवनी तालुक्यात आगीच्या अनेक घटना घडल्या. तालुक्यात चौरास भागात आगीने अनेकवेळा शेत पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान टाळण्यासाठी भंडारा येथून वाहन बोलाविण्यात येते. अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळापर्यत पोहचेपर्यत धानपीके किंवा अन्य पिके जळून भस्मसात झाले आहेत.
साकोली तालुक्यासाठी अग्नीशमन दलाची यंत्रणा असणे गरजेचे आहे. त्यामुळे यंत्रणा स्थापन करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन अनेकदा साकोलीवासीयांनी उन्हाळ्यात दिले आहे. मात्र या मागणीकडे नेहमीच लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. आग विझविण्यासाठी नागरिक स्वत: मिळेल त्या साधनाने प्रयत्न करीत असतात.
मोहाडी तालुक्यातही अग्नीशामक यंत्रणा नाही. तालुक्यात एखादी घटना घडल्यास भंडारा किंवा तुमसर येथील अग्नीशामक विभागाला पाचारण करावे लागते. अशीच अवस्था लाखनी तालुक्याचीही आहे. खासगी अग्नीशामक व्यवस्थेवर बहुतांश वेळा अवलंबून राहावे लागते. एकंदरीत जिल्हा हा अग्नीशामन यंत्रणेबाबत ढेपाळलेला दिसून येतो. अग्नीशामक विभागात विभागप्रमुख, फायरमन, वाहनचालक, मदतीला दिलेले कर्मचारी, मदतनीस, चौकीदार यांची गरज असते.

भंडारा, तुमसरातच वाहने
भंडारा, तुमसर व पवनी नगर परिषदेकडे अग्नीशमन वाहने उपलब्ध आहेत. परंतु पवनी नगर परिषदेचे वाहन चालकाअभावी बंद आहे. जिल्ह्यात कुठेही आगीच्या घटना घडल्या तर भंडारा व तुमसर येथून वाहने जात असतात. तुमसर टोकावर असल्यामुळे ते वाहन साकोली, लाखांदूर येथे जाण्यासाठी बराच उशिर लागतो. त्याठिकाणी भंडारा येथील वाहन घेऊन जावे लागते. त्याशिवाय आयुध निर्माणी कारखाना जवाहरनगर आणि वरठी येथील सनफ्लॅग कारखान्याच्या वाहनांवर अवलंबून राहावे लागते.

Web Title: Fire fighting machinery due to lack of vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.