आरक्षण सोडतीत दिग्गजांची अग्निपरीक्षा

By admin | Published: October 6, 2016 12:46 AM2016-10-06T00:46:48+5:302016-10-06T00:46:48+5:30

क्षणोक्षणी उत्कंठा वाढविणाऱ्या नगराध्यक्षपद आरक्षणाची सोडत आज मुंबईत काढण्यात आली.

Fire test | आरक्षण सोडतीत दिग्गजांची अग्निपरीक्षा

आरक्षण सोडतीत दिग्गजांची अग्निपरीक्षा

Next

राजकीय वातावरण तापले : भंडारा ओबीसी सर्वसाधारण, पवनी ओबीसी महिला, साकोली अनुसूचित जाती महिला तर तुमसरात खुला प्रवर्ग
भंडारा : क्षणोक्षणी उत्कंठा वाढविणाऱ्या नगराध्यक्षपद आरक्षणाची सोडत आज मुंबईत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीनंतर काही ठिकाणी अध्यक्षपद बनण्याचे स्वप्न भंगले असून काही ठिकाणी दिग्गजांना उमेदवारी मिळविण्यापासून जिंकून येईपर्यंत अग्निपरिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. महिला आरक्षणामुळे पवनी व साकोली येथे पुरूष उमेदवारांमध्ये असलेला उत्साह मावळला आहे. आजच्या आरक्षण सोडतीत भंडारा नगराध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी, पवनीत ओबीसी महिला प्रवर्गासाठी, साकोलीत अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी तर तुमसरात नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे. भंडाऱ्यात ओबीसी सर्वसाधारण आरक्षण घोषित झाल्यामुळे इच्छूकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पवनी व साकोलीत राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून प्रभावी महिला उमेदवारांचा शोध सुरु होणार आहे. तुमसरात खुला प्रवर्गामुळे अनेकांनी बाशिंग बांधले आहेत. थेट नगराध्यक्ष निवडून द्यायचे असल्याने मातब्बर नशिब आजमावणार असून उमेदवारीसाठी पहिली अग्निपरीक्षा महत्त्वाची ठरणार आहे.

भंडाऱ्यात तुल्यबळ लढती !
जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाली आहे. त्यामुळे भंडाऱ्यात ही निवडणूक चुरशीची होणार असली तरी उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. भंडारा पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. ओबीसी आरक्षणामुळे विद्यमान नगराध्यक्ष बाबूराव बागडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून प्रमुख दावेदार राहतील. याशिवाय भगवान बावनकर, रूबी चढ्ढा, विनयमोहन पशिने, हेमंत महाकाळकर हेसुद्धा उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. भाजपचे गटनेते सुर्यकांत ईलमे हे भाजपातून प्रमुख दावेदार असून सुनिल मेंढे, संजय कुंभलकर हे सुद्धा उमेदवारी मागण्यासाठी सज्ज आहेत. शिवसेनेतून उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे व अनिल गायधने ईच्छूक आहेत. काँग्रेसमधून उद्धव डोरले यांच्या नावाची चर्चा सुरू असून भाजपातून काँग्रेसमध्ये आलेले महेंद्र निंबार्ते हे उमेदवारी मागण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भ राज्य आघाडी या निवडणुकीत उमेदवार उभा करणार असले तरी अद्यापपर्यंत उमेदवार चर्चेत आलेला नाही. श्रेष्ठीवर उमेदवारी ठरलेली असल्यामुळे मोर्चेबांधणी सुरू आहे.

तुमसरात रस्सीखेच
तुमसरातील नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने अनेकांचे स्वप्न भंगणार आहेत. राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या या नगरपरिषद निवडणुकीत चारही प्रमुख पक्ष मैदानात उतरणार आहेत. पदाधिकारी व इच्छुकांचे हृदयाचे ठोके वाढले आहेत. तुमसर नगरपरिषदेत सध्या राकाँची सत्ता आहे. तुमसर नगरपरिषदेत २३ नगरसेवक आहेत. यात राकाँ १३, भाजप ५, काँग्रेस ३ तथा अपक्ष २ अशी पक्षीय स्थिती आहे. तुमसर शहरातील मतदारांची संख्या ४४,७८५ इतकी आहे. यापूर्वी नगरसेवकांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. सन २००७ मध्ये भाजपच्या गीता कोंडेवार या थेट जनतेमधून निवडून आल्या होत्या. राकाँकडून विद्यमान नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, नगरसेवक राजेश देशमुख, योगेश सिंगनजुडे, भाजपकडून नगरसेवक शाम धुर्वे, प्रदीप पडोळे, डॉ.गोविंद कोडवानी, काँग्रेसकडून अरविंद कारेमोरे, नगरसेवक प्रमोद तितीरमारे, माजी आमदार अनिल बावनकर, शिवसेनेतून उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, प्रा.कमलाकर निखाडे यांची दावेदारी प्रमुख मानली जात आहे.

पवनीत तोंडचे पाणी पळाले
पवनी नगरपरिषद अध्यक्षपदाचे आरक्षण सोडतीकडे पुरुष वर्गाचे लक्ष लागलेले असताना जाहीर झालेल्या सोडतीत इतर मागासवर्गीय (महिला) असे आरक्षण निघाले. परिणामी नगराध्यक्षपदावर आरुढ होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राजकीय पुरुष मंडळींच्या तोंडचे पाणी पळाले आहे. विद्यमान नगराध्यक्षांनी अडीच वर्षांचा कार्यकाळ तारेवरची कसरत करून पूर्ण केल्याने पुढचे पाच वर्ष सत्तारुढ होण्याची संधी चालून आली आहे. फक्त आता मतदारांच्या आशीर्वादाची गरज भासणार आहे. आरक्षणाचा विषय बाजूला ठेवला तर पवनी नगरातील सक्रीय राजकारणात महिलांचा वाटा फार कमी आहे. पतीराजांच्या राजकीय डावपेचातच महिलांची राजकीय पार्श्वभूमी चर्चेत असते. त्यामुळे महिला उमेदवारांचा शोध घेताना सर्वच राजकीय पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नगरात जनसंख्या व धनशक्तीचा विचार केल्यास बावनकर, देशमुख, काटेखाये व मुंडले हे परिवार पहिल्या रांगात बसणाऱ्यांपैकी आहेत. परंतु राजकारणात सक्रीयतेचा विचार केल्यास उरकुडकर, नंदरधने, तलमले, मोटघरे या परिवाराचा देखील समावेश होऊ शकतो.

साकोलीत येणार महिलाराज
प्रदीर्घ प्रयत्नानंतर साकोली नगरपरिषदेची घोषणा झाली. नगराध्यक्ष आरक्षण अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाले. परिणामी साकोलीत पाच वर्षांसाठी का असेना महिला राज येणार आहे. विशेष म्हणजे नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदावर महिला आरुढ होण्याची किमया साधली जाणार आहे. साकोली व सेंदुरवाफा या दोन्ही गावे मिळून साकोली नगरपरिषदेची घोषणा झाली आहे. १७ सदस्यीय या क्षेत्रात सदस्यांचे प्रभागनिहाय आरक्षण घोषित झाले आहे. महिलांसाठी सदर पद राखीव झाल्याने पुरुष उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. नगराध्यक्ष निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आशा मदन रामटेके, माजी सरपंच कौशल्याबाई नंदेश्वर, सविता शहारे, सुरेखा शहारे, अर्चना रवी राऊत, भाजपकडून धनवंता राऊत, नालंदा टेंभुर्णे यांची नावे चर्चेत असून काँग्रेस पक्षाकडून माजी सभापती ताराबाई तरजुले, शालू नंदेश्वर यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेना ही या निवडणुकीत ताकतनिशी उतरणार असून सर्व प्रभागातून उमेदवार उभे राहणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Fire test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.