खुर्शीपार येथे आगीत दोन घरे भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:18 AM2019-05-16T00:18:08+5:302019-05-16T00:19:54+5:30
भंडारा तालुक्यातील खुर्शीपार येथे मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत सख्ख्या भावांची दोन घर जळून भस्मसात झाले. या आगीने सिलिंडरचा स्फोट झाल्याने रौद्ररुप धारण केले. घरातील सर्व साहित्य जळाले असून सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहदुरा : भंडारा तालुक्यातील खुर्शीपार येथे मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत सख्ख्या भावांची दोन घर जळून भस्मसात झाले. या आगीने सिलिंडरचा स्फोट झाल्याने रौद्ररुप धारण केले. घरातील सर्व साहित्य जळाले असून सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भंडारा येथील अग्नीशामक दलाला पाचारण केल्यानंतर आग आटोक्यात आली.
खुर्शीपार येथे अशोक शंकर मिरासे व अरविंद शंकर मिरासे या दोन भावांची घरे लागून आहेत. मंगळवारी रात्री अचानक घराला आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्र रुप धारण केले. त्यातच सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग आणखीन भडकली. आगची माहिती मिळताच गावकऱ्यांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नव्हती. आगीचे तांडव शेजारच्या घराला पण लागले. राजेंद्र फुले यांच्या घरी किरायाने राहणाºया हलमारे यांच्या घराचेही नुकसान झाले. मिरासे यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यात गहू, तांदूळ, कागदपत्रे,पैसे दागिने जळून गेले. सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
बुधवारी तलाठी ए.एन. माटे यांनी पंचनामा केला. तहसीलदार अक्षय पोयाम यांनी घटनास्थळाला भेट दिली. एक महिन्याचे राशन व साहित्य प्रशासनाकडून देण्यात येणार आहे.
सरपंच झलके यांनी सुद्धा घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या आगीत संपूर्ण साहित्य भस्मसात झाल्याने केवळ अंगावरील कपडेच बचावले आहे. त्यामुळे या कुटुंबाला तात्काळ मदत करण्याची आवश्यकता आहे. या आगीने दोन कुटुंब मात्र उघड्यावर आले आहेत.
मुलीला सुखरुप बाहेर काढले
मिरासे यांच्या घराला आग लागली त्यावेळेस घरात एक लहान मुलगी झोपलेली होती. हा प्रकार लक्षात येताच मिरासे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता घरात प्रवेश करून मुलीला बाहेर काढले. आग लागली त्यावेळी एका भावाचा परिवार बाहेरगावी गेला होता. तर दुसऱ्या भावाचा परिवार जेवण झाल्यानंतर बाहेर बसलेला होता.
माजी आमदारांकडून मदतीचा हात
खुर्शीपार येथील मिरासे कुटुुंबीयांचे घर जळालेल्याची माहिती मिळताच माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी खुर्शीपारला भेट दिली. या आगीत कुटुंब उध्वस्त झाल्याचे पाहून त्यांनी दोन्ही भावांना प्रत्येकी पाच पाच हजार रुपयाची मदत केली. तसेच प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.