धनत्रयोदशीलाच फटाक्यांची आतषबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:00 AM2017-10-18T00:00:58+5:302017-10-18T00:01:41+5:30
गाव स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची ठरणाºया ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल मंगळवारला दुपारी घोषित झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गाव स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची ठरणाºया ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल मंगळवारला दुपारी घोषित झाले. निकालानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या चेहºयांवर आनंद व उत्साह दिसून आला तर पराभूत उमेदवारांच्या गोटात नाराजी दिसून आली. या निवडणुकीत काही ठिकाणी जुन्यांना नाकारले तर काही ठिकाणी नव्यांना संधी मिळाली आहे. लक्ष्मीपुजन उद्या असताना आज धनत्रयोदशीला गावागावात फटाक्यांची आतषबाजी झाली.
भंडारा जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायतीसाठी सोमवारला ८८ टक्के मतदान झाले. यात तुमसर तालुक्यात ७७, मोहाडी तालुक्यात ५८, भंडारा तालुक्यात ३९, पवनी तालुक्यात ४५, साकोली तालुक्यात ४१, लाखनी तालुक्यात ५१ तर लाखांदूर तालुक्यात ५१ ग्रामपंचायत साठी निवडणुका पार पडल्या.
भंडारा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी येथील पोलीस बहुउद्देशीय सभागृहात सकाळी १० वाजतापासून सुरू झाली. भंडारा तालुक्यातील लक्षवेधी गणेशपुरात गणेशपूर ग्रामविकास आघाडीचे मनिष गणवीर हे सरपंचपदी विजयी झाले. बेला येथे बालू ठवकर यांच्या नेतृत्वात सरपंचपदी पूजा ठवकर आणि आठ सदस्य विजयी झाले.
भंडारा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतपैकी २६ ठिकाणी भाजप गटाने कब्जा केला. लाखनी तालुक्यात काँग्रेसने मुसंडी मारली आहे. सरपंच थेट निवडणूक असल्याने अनेक ग्रामपंचायतवर सरपंच रुपाने काँग्रेस उमेदवारांनी सत्ता हस्तगत केली.
साकोली तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीचे निकाल आज जाहीर करण्यात आले. यात काँग्रेस, भाजपा, राकाँ प्रणित उमेदवारांचा विजय झाला असून विजयी उमेदवारांनी उत्साहात विजयी रॅली काढली.
लाखांदूर तालुक्यात २३ ग्रामपंचायतीवर कॉंग्रेस समर्थित सरपंच विजयी झाले असून भाजप समर्थित २० ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज करण्यात यश आले तर राष्ट्रवादी काँग्रेसला २ ठिकाणी तर ५ ठिकाणी अपक्ष सरपंच निवडून आले.
मोहाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी मोठ्या गावांमध्ये अपेक्षित यश मिळाले नसल्याचे चित्र आहे.
पोस्टल मतावर ठरला विजय
गणेशपूर येथील गांधी वॉर्डात गोवर्धन साकुरे व त्यांचे प्रतिस्पर्धी गजेंद्र मेहर यांना प्रत्येकी ४४७ मते मिळाली. या वॉर्डात ९०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. १५ मतदारांनी नोटाचा वापर केल्याने दोघांनाही समान मते मिळाली. मात्र एका मतदाराने केलेले पोस्टल मतदान गोवर्धन साकुरे यांना मिळाल्याने साकुरे हे पोस्टल मतावर सदस्य म्हणून विजयी ठरले.
विजयानंतरही जोपासली सामाजिक बांधिलकी
गणेशपूरच्या माजी सरपंच माधुरी देशकर या राजेंद्र वॉर्डातून सदस्य पदाकरिता आज निवडून आल्या. सोमवारला देशकर यांच्या शेजारी राहणारे यशवंत सेलोकर हे सोमवारला मतदान बजावून आल्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्यांचे निधन झाले. आज निवडणुकीचा निकाल घोषित झाला. मात्र सेलोकर यांच्या घरी दु:खाचे सावट असल्यामुळे विजयी होऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत माधुरी देशकर यांनी विजयोत्सव साजरा केला नाही.
गुलालाची उधळण
च्निकालानंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. यात फुलांच्या हारांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली.