पहिल्या दिवशी २ लाख वृक्षांची लागवड

By admin | Published: July 2, 2017 12:22 AM2017-07-02T00:22:36+5:302017-07-02T00:22:36+5:30

जल, जंगल आणि जमिन या तीनही पर्यावरणाच्या दृष्टीने आणि एकूणच आपल्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम करणाऱ्या बाबींसाठी राज्य शासनाने महत्वाचे पाऊल उचलले असून...

On the first day, plantation of 2 lakh trees | पहिल्या दिवशी २ लाख वृक्षांची लागवड

पहिल्या दिवशी २ लाख वृक्षांची लागवड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जल, जंगल आणि जमिन या तीनही पर्यावरणाच्या दृष्टीने आणि एकूणच आपल्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम करणाऱ्या बाबींसाठी राज्य शासनाने महत्वाचे पाऊल उचलले असून त्याचाच एक भाग म्हणून चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ आज शनिवारला जिल्हाभरात करण्यात आला.
भंडारा जिल्ह्याला ७ लाख ६८ हजार वृक्षांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत वनविभागाने १ लाख ३६ हजार ८४८, ग्रामपंचायत विभागाने ६३ हजार १५० व अन्य विभागाने २६०० असे एकूण २ लाख २ हजार ५९८ वृक्ष लावण्यात आले. ही आकडेवारी वनविभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी व शुध्द आॅक्सीजन मिळण्यासाठी शासनाने चार कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला असून प्रत्येक विद्यार्थ्यांला वृक्षसंवर्धनासाठी दोन झाडे देण्यात येणार आहेत. ही झाडे तीन वर्ष जोपासणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षी एक हजार रूपये, जास्त वृक्ष जगविणाऱ्या शाळेला दहा हजार रूपये तर जिल्ह्यात पहिल्या येणाऱ्या शाळेला २५ हजार रूपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी शनिवारला केली.
वनविभागाच्यावतीने १ जुलै ते ७ जुलै वृक्ष लागवड सप्ताह माटोरा गावातील रोपवनात आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या वृक्षलागवडीचा शुभारंभ जिल्हाधिकारी सुहास दिवसे व आमदार रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सामाजिक वनिकरण विभागीय अधिकारी योगेश वाघाये, सहायक वनसंरक्षक राजेंद्र चोपकर, वनपरिक्षेत्र अधिकारी भोगे उपस्थित होते.
वृक्ष लागवड सप्ताहानिमित्त जिल्ह्याला सात लाख ६८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हयातील प्रत्येक शाळा, शासकीय कार्यालयात ७ जुलैपर्यंत वृक्ष लागवड करता येणार आहे. ज्या नागरिकांनी किंवा संस्थांनी वृक्षारोपण केले नसेल त्यांनी आपल्या अवतीभोवतीच्या मोकळया जागेत ७ जुलैपर्यंत वृक्षारोपण करून या लोकअभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे.

Web Title: On the first day, plantation of 2 lakh trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.