पहिली ते नववी ५० टक्के, तर दहावी-बारावीच्या शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:24 AM2021-06-20T04:24:04+5:302021-06-20T04:24:04+5:30
भंडारा : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या संदर्भात कुठलीही रिस्क घेण्यास तयार नाही. त्यामुळे यंदाच्या ...
भंडारा : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या संदर्भात कुठलीही रिस्क घेण्यास तयार नाही. त्यामुळे यंदाच्या शैक्षिणक सत्राची सुरुवात सुद्धआ ऑनलाइन पद्धतीनेच करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पहिली ते नववीच्या शिक्षकांची ५० टक्के, तर दहावी ते बारावीच्या शिक्षकांना १०० टक्के शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.
यासंदर्भातील निर्देश सुद्धा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने काढले आहे. जिल्हा परिषदेच्या ७९४, न. प.च्या २२, केंद्रीय सहा, अनुदानित ३४१ आणि विनाअनुदानित १५८ शाळा असून, या सर्व शाळांना २८ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात करण्याचे आदेश दिले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सवाने ऑनलाइन पद्धतीनेच साजरा करण्यात येणार आहे.
शिक्षक शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे देणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत जावून दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे बोलल्या जाते. २८ जूनपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार असली तरी शाळेच्या पहिल्या दिवसाची घंटा सुद्धा ऑनलाइनचा वाजणार असून, विद्यार्थ्यांचा किलबिलाटदेखील ऑनलाइनच ऐकावा लागणार आहे.
भंडारा जिल्ह्यात एकूण १३२१ शाळा असून, ७,८२६ शिक्षक विद्यार्जनाचे धडे देतात. भंडारा तालुक्यातील २६७ शाळांमध्ये १९८४ शिक्षक, लाखांदूर १४३ शाळांमध्ये ७०७ शिक्षक, लाखनी १५० शाळांमध्ये ८६९, मोहाडी १६० शाळांमध्ये ९५२, पवनी १९६ शाळांमध्ये ९९५, साकोली १५७ शाळांमध्ये ८८६, तर तुमसर तालुक्यातील २४८ तालुक्यांमध्ये १४३३ शिक्षक कार्यरत आहेत. तसेच यासह विनाअनुदानित शाळांचे बहुसंख्य शिक्षक ऑनलाइन शिक्षणातून विद्यार्थ्यांना ज्ञानर्जन करणार आहे.
राज्य शासनाच्या शिक्षण संचालनालय यांनी पत्र जारी करून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सुरू करण्याविषयी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र जारी केले आहे. या पत्रामध्ये इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीचे ५० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील. इयत्ता दहावी व बारावीचे १०० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य आहे. यासह शिक्षकेत्तर कर्मचारी यांची १०० टक्के उपस्थिती, तर प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी १०० टक्के उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे आदेश धडकले आहे.