पहिल्या टप्प्यात ४७५० फ्रंटलाइन योद्ध्यांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:29 AM2021-01-15T04:29:53+5:302021-01-15T04:29:53+5:30
शनिवारी (दि, १६) जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा, उपजिल्हा रुग्णालय, तुमसर, ग्रामीण रुग्णालय, लाखनी येथे लसीकरण करण्यात येणार आहे. या ...
शनिवारी (दि, १६) जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा, उपजिल्हा रुग्णालय, तुमसर, ग्रामीण रुग्णालय, लाखनी येथे लसीकरण करण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष उभारण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थकेअर वर्कर म्हणजे आरोग्यसेवा देणाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थींची यादी यापूर्वीच कोविन ॲपवर अपलोड करण्यात आली आहे. शुभारंभाच्या दिवशी तीन केंद्रांवर ३०० लाभार्थींना लस देण्यात येईल तर आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, बुधवार व गुरुवारला नियमितपणे लसीकरण सुरू राहणार आहे. केंद्रावर लाभार्थींना टोकन देण्यात येणार आहे. त्यावर लसीकरणाची वेळ, दिनांक तर दुसऱ्या बाजूला संपर्कासाठी हेल्पलाइन क्रमांक नमूद असणार आहे. लसीकरण करून घरी आल्यावर काही त्रास झाल्यास नमूद क्रमांकवर संपर्क साधता येणार आहे. लस घेतल्यानंतरही मास्क वापरणे आवश्यक आहे.
जिल्ह्यासाठी ९५०० डोस आरोग्य विभागाला प्राप्त
सीरम इन्स्टिट्यूट पुणेद्वारा निर्मित कोविशिल्ड लसीचे ९५०० डोस आरोग्य विभागाला १४ जानेवारी रोजी प्राप्त झाले आहेत. प्रत्येकी दोन डोस याप्रमाणे ४७५० लाभार्थींना ही लस स्नायुमध्ये पॉइंट पाच एमएल द्यावयाची आहे. एका व्हायलमध्ये दहा लाभार्थी कव्हर होणार आहेत. याच लाभार्थींना दुसरा डोस २८ दिवसांनंतर दिला जाणार आहे.
कोट
कोविड लसीकरण जिल्हा कृती दलाची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यासोबत कोविन ॲपवर डाटा अपलोड करण्यासाठी एक चमू असणार आहे. टप्प्याटप्प्याने लसीकरण वाढविण्यात येणार आहे. त्याचे आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य आवश्यक आहे.
- संदीप कदम, जिल्हाधिकारी, भंडारा