आधी फुटपाथ व्यावसायिकांचे पुनर्वसन करा, नंतर अतिक्रमण हटवा
By admin | Published: January 4, 2017 12:42 AM2017-01-04T00:42:08+5:302017-01-04T00:42:08+5:30
स्मार्ट सीटी’च्या नावावर फेरीवाले आणि फुटपाथ व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवून त्यांना बेरोजगार करण्यात येत असेल
सूर्यकांत ईलमे : अन्यथा ९ पासून आंदोलन करणार
भंडारा : ‘स्मार्ट सीटी’च्या नावावर फेरीवाले आणि फुटपाथ व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवून त्यांना बेरोजगार करण्यात येत असेल तर अशा ‘स्मार्ट सीटी’ला शिवसेनेचा विरोध राहील. आधी फेरीवाले व फुटपाथ व्यावसायिकांचे पुनर्वसन करा, अन्यथा ९ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कचेरीसमोर आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा शिवसेनेचे शहरप्रमुख सुर्यकांत ईलमे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिला.
यावेळी ईलमे म्हणाले, फुटपाथ व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने आदर्श पथ विक्रेता जिवीका संरक्षण व पथ विक्रय विनियम विधेयक २००९ तयार केला आहे. त्यामुळे आता शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईपूर्वी ज्या ठिकाणी फुटपाथ विक्रेते व्यवसाय करीत होते, त्याच ठिकाणी त्यांचे पुनवर्सन करण्यात यावे, आखून दिलेल्या रेषेबाहेर कुणी अतिक्रमण करीत असेल तर कारवाई करावी, या विधेयकाअंतर्गत फेरीवाले आणि फुटपाथ विक्रेत्यांची नोंदणी करून समन्वय समिती तयार करण्यात यावी, या समितीच्या माध्यमातून फुटपाथ व्यावसायिकांच्या कार्यप्रणालीवर नियंत्रण ठेवण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या विधेयकाअंतर्गत तत्कालीन जिल्हाधिकारी सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी शहरामध्ये सर्वेक्षण केलेल्या सर्वेक्षणानंतर शहरात फेरीवाल्यांसाठी झोन तयार करण्यासाठी योजना आखली होती. परंतु त्यांची बदली झाल्यामुळे नंतरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी कोणताही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे फुटपाथ व्यावसायिकांना नेहमी समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोपही ईलमे यांनी केला. (जिल्हा प्रतिनिधी)